Womens World Cup Final Ind vs SA : सात वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला उपांत्य फेरीत पराभूत करून हरमनप्रीत कौर आणि तिचा संघ मुंबईत आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे.
Womens World Cup Final Ind vs SA : महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा अंतिम सामना आहे. दक्षिण आफ्रिका हा प्रतिस्पर्धी संघ आहे. दुपारी तीन वाजल्यापासून नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर हा अंतिम सामना रंगणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ हॉटस्टारवर सामना थेट पाहता येईल. विजेतेपद कोणीही जिंकले तरी महिला क्रिकेटला नवीन चॅम्पियन मिळणार हे यावेळचे वैशिष्ट्य आहे. इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाशिवाय महिला एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नवा इतिहास रचून पहिल्या विजेतेपदासाठी भारत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत उतरत आहे, तर दक्षिण आफ्रिकेसाठी हा पहिलाच अंतिम सामना आहे. सात वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला उपांत्य फेरीत पराभूत करून हरमनप्रीत कौर आणि तिचा संघ मुंबईत आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. इंग्लंडला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गट टप्प्यात दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या तीन विकेट्सच्या पराभवाचा बदला घेण्याची संधीही टीम इंडियाकडे आहे.
भारतीय संघातील खेळाडू
जेमिमा रॉड्रिग्जच्या ऐतिहासिक शतकाने टीम इंडिया आणि चाहत्यांना प्रचंड उत्साह आणि आशा दिली आहे. यामुळे संघही स्थिर झाला आहे. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी चांगली सुरुवात केल्यास भारतासाठी गोष्टी सोप्या होतील. जेमिमा, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा आणि रिचा घोष यांच्यामुळे मधली फळी मजबूत आहे. क्रांती गौड, श्री चरणी आणि रेणुका सिंग यांची गोलंदाजीची कामगिरीही अंतिम सामन्यात निर्णायक ठरेल.

दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू
लॉरा वोल्वार्ड, नेडीन डी क्लार्क, मारिझान कॅप आणि टॅझमिन ब्रिट्स यांच्यावर दक्षिण आफ्रिकेच्या आशा अवलंबून आहेत. फलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक निर्णायक ठरेल. दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी दव एक आव्हान असेल, तसेच पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


