छत्तीसगडमधील जगदलपूरमध्ये ग्राहक बनून आलेल्या काही महिलांनी ज्वेलरी शोरूममधून तब्बल १.७४ कोटी रुपयांचे दागिने चोरले आहेत. दिवाळीच्या गर्दीत त्यांनी कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून ही चोरी केली. पोलीस आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास करत आहेत.
जगदलपूर, छत्तीसगडमध्ये एका ज्वेलरी शोरूममधून ग्राहक बनून आलेल्या काही महिलांनी तब्बल १.७४ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, संजय मार्केट जवळील मोती ज्वेलर्समध्ये दिवाळीच्या गर्दीच्या वेळी हा प्रकार घडला.
या महिला आपल्या लहान मुलांसोबत दुकानात आल्या होत्या. त्यांनी कर्मचाऱ्यांना वेगवेगळे डिझाईन्स दाखवण्यास सांगून त्यांना कामात गुंतवले. कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित झाल्याची संधी साधून त्यांनी सोन्याच्या दागिन्यांचा एक बॉक्स पळवला.
दुकानदाराचे लक्ष नसताना एका महिलेने तो बॉक्स आपल्या बॅगेत सरकावला. त्यानंतर कुणालाही संशय येऊ न देता त्या दुकानातून निघून गेल्या. नंतर जेव्हा कर्मचाऱ्यांना तो दागिण्यांचा बॉक्स गायब असल्याचे समजले, तेव्हा ही चोरी उघडकीस आली.
या महिलांच्या दुकानातील हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. या घटनेत कोण सामील होते आणि चोरी कशी केली गेली, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
दुकानमालकाच्या मते, चोरी गेलेल्या बॉक्सची किंमत अंदाजे १.७४ कोटी रुपये असून त्यात एक किलोहून अधिक सोन्याचे दागिने होते. मात्र, चोरीला गेलेल्या दागिन्यांची नेमकी संख्या आणि किंमत अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेली नाही.
व्हायरल सीसीटीव्ही व्हिडिओ पाहा
तक्रार मिळाल्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी शोरूममध्ये पोहोचले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासत आहेत.
सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी लीलाधर राठोड यांनी सांगितले की, चोरीची तक्रार मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.












