गाझियाबादच्या वेव्ह सिटीमध्ये लग्नात पाहुणा म्हणून आलेल्या अज्ञात चोराने २२.५ लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरून पोबारा केला. कुटुंबीय डान्स फ्लोअरवर असताना या चोराने हातसफाई केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
गाझियाबादमधील वेव्ह सिटी भागात २० नोव्हेंबरला एका लग्नसोहळ्यात खळबळ उडाली. एका अज्ञात चोराने पाहुणा बनून चक्क २२.५ लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरून नेली. या चोरीचा हा सर्व प्रकार बँक्वेट हॉलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यावेळी मुलीचे कुटुंबीय लग्नाच्या आनंदात मग्न होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील द्वारका येथून आलेल्या वऱ्हाडाच्या वेळी ही घटना घडली. संशयित आरोपीने गर्दीचा फायदा घेतला आणि तो पाहुण्यांमध्ये अगदी सहज मिसळून गेला. त्याने तिथे जेवणही केलं आणि त्याचवेळी तो हळूच कुटुंबाच्या सामानावर पाळत ठेवून होता.
कुटुंबातील सदस्य जेव्हा त्यांच्या पर्स आणि हँडबॅग जवळच्या टेबलवर ठेवून डीजे डान्स फ्लोअरवर गेले, तेव्हा त्याला संधी मिळाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण दिसतोय, ज्याने जीन्स आणि स्पोर्ट्स शूज घातलेत, हातात जॅकेट घेतलंय आणि तो अगदी आरामात टेबलजवळ पोहोचतोय.
आपल्याकडे कोणी बघत नाहीये ना, याची खात्री केल्यानंतर, त्याने झटकन मौल्यवान सामानाची बॅग उचलली, जॅकेटमध्ये लपवली आणि कोणालाही संशय न येऊ देता हॉलमधून बाहेर पडला.
डान्स फ्लोअरवरून परतल्यानंतर, बॅग गायब असल्याचं लक्षात येताच कुटुंबाला धक्का बसला. चोरलेल्या बॅगेत २.५ लाख रुपयांची रोकड आणि जवळपास २० लाख रुपये किमतीचे सोन्याचे आणि इतर दागिने होते.
परिसरात घाईघाईने शोध घेऊनही काहीही न सापडल्याने, पीडित कुटुंबाने वेव्ह सिटी पोलिसांना माहिती दिली.
पाहा व्हायरल सीसीटीव्ही व्हिडीओ
बँक्वेट हॉलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताना, आरोपीचं बाहेर पडणं अधिकाऱ्यांच्या लगेच लक्षात आलं. आरोपीने हे काम एकट्याने केलेलं नसावं, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे त्याला पळून जाण्यास मदत करण्यासाठी त्याचे साथीदारही पाहुणे म्हणून हॉलमध्ये आले होते का, याचा पोलीस तपास करत आहेत.
प्रशासनाने तक्रार दाखल केली असून, गुन्हेगाराला शोधण्यासाठी आणि पकडण्यासाठी सध्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.














