पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंदार मारुती किवळे असे या मृत तरुणाचे नाव असून, जामिनावर सुटल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच ही घटना घडल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील पुणे शिवाजीनगर न्यायालयाबाहेर आज दुपारी एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. मंदार मारुती किवळे असे या मृत तरुणाचे नाव असून, हल्ल्यानंतर त्याचा एक हात तुटलेल्या अवस्थेत तो पदपथावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

२० एप्रिल २०२५ रोजी पुण्याच्या संतोषनगर कात्रज भागात जमीन आणि आर्थिक वादातून शुभम सुभाष चव्हाण याची हत्या झाली होती. या गुन्ह्यात मंदार किवळे याला अटक करण्यात आली होती.

*सूचना: खालील व्हिडीओमध्ये हिंसक दृश्ये आहेत. कृपया स्वजबाबदारीवर पाहावे.

पाहा धक्कादायक व्हिडीओ

Scroll to load tweet…

तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर चारच दिवसांनी मंदार न्यायालयातील सुनावणीसाठी आला होता. यावेळी न्यायालयाबाहेरच त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मंदार पदपथावर गंभीर अवस्थेत पडलेला दिसत असून, लोक बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसते. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर सुझुकी अ‍ॅक्सेस आणि होंडा अ‍ॅक्टिव्हा या दोन दुचाकींवरून आले होते. अ‍ॅक्सेसवर चार तर अ‍ॅक्टिव्हावर तीन जण होते, असे सांगितले जात आहे.

गंभीर जखमी झालेल्या मंदारला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात तीन ते चार जण सामील असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन अग्निशस्त्रे आणि गोळ्या असलेली एक मॅगझीन जप्त केली आहे. हल्ल्याच्या झटापटीत एक पिस्तूल आणि मॅगझीन रस्त्यावर पडल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.