तेलंगणाच्या भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात एका १८ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीची गळा आवळून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या २२ वर्षीय प्रियकराला अटक केली आहे.

तेलंगणाच्या भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात एका १८ वर्षीय बीएससी नर्सिंग विद्यार्थिनीची गळा आवळून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी एका २२ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. ही धक्कादायक घटना २२ सप्टेंबर रोजी घडली. वांगन्नापलेम गावात ही तरुणी तिच्या घरात मृतावस्थेत आढळली होती. सुरुवातीला मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अंतर्गत संशयास्पद मृत्यूची नोंद केली होती.

पण जेव्हा शवविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवाल समोर आला, तेव्हा वायरने गळा आवळून तिची हत्या झाल्याचं उघडकीस आलं. या नव्या माहितीनंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि BNSS च्या कलम १०३(१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या तपासात असं समोर आलंय की, आरोपी आणि मृत तरुणी गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ते दोघे लग्नही करणार होते. पण त्यांच्या कुटुंबीयांमध्ये लग्नावरून वाद सुरू होते, ज्यामुळे त्यांच्यातही तणाव वाढला होता.

कुटुंबातील या वादामुळे तरुणीने लग्नाला नकार दिला. याच रागातून आरोपीने तिची हत्या केली, असं पोलिसांनी सांगितलं.

हत्या केल्यानंतर आरोपी तिथून पळून गेला होता. पण पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.