आसामच्या कामाख्या रेल्वे स्टेशनवर एका महिलेसोबत अतिशय संतापजनक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने तिच्याकडे एकटक पाहत अश्लील हावभाव केले. या घटनेचा व्हिडिओ तिने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून तो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

भारतात महिलांसाठी आता नातेवाईकांना रेल्वे स्टेशनवर सोडायला जाणंही सुरक्षित राहिलेलं नाही. गुवाहाटीमधील एका रेल्वे स्टेशनवर आसामच्या एका महिलेसोबत असाच एक धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे देशातील महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती तिच्याकडे बघून अश्लील हावभाव करताना दिसत आहे.

व्हिडिओनुसार, ही महिला तिच्या एका नातेवाईकाला सोडण्यासाठी माळीगाव येथील कामाख्या रेल्वे स्टेशनवर गेली होती. ट्रेन यायला अर्धा तास वेळ होता, त्यामुळे ती तिथेच थांबली होती. त्याचवेळी एका व्यक्तीची नजर तिच्यावर पडली आणि तो तिच्याकडे एकटक पाहू लागला.

तो माणूस बराच वेळ तिच्याकडे बघत होता. हे लक्षात आल्यावर तिने मोबाईल काढून त्याचं रेकॉर्डिंग सुरू केलं. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, तो माणूस तिच्याकडे बघत आपल्या पँटमध्ये हात घालून अश्लील चाळे करत होता.

महिलेने मोबाईल काढल्याचं पाहताच तो माणूस तिथून निघून गेला. पण जशी ट्रेन आली, तसा तो पुन्हा तिथे प्रकटला. तो ट्रेनमध्ये चढला आणि दारात उभं राहून पुन्हा त्या महिलेकडे एकटक पाहू लागला, असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या घटनेबद्दल सांगताना महिला म्हणाली, "आज मी एका नातेवाईकाला सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेले होते. आम्ही अर्धा तास लवकर पोहोचलो. आम्ही ट्रेनची वाट पाहत असताना हा माणूस आमच्याकडे एकटक बघत होता आणि काहीतरी कमेंट्स पास करत होता. मी त्याचा व्हिडिओ काढायचं ठरवलं. मी फोन काढल्याचं बघून तो पळून गेला. पण ट्रेन आल्यावर तो अचानक पुन्हा आला आणि असे घाणेरडे चाळे करू लागला."

पाहा व्हायरल व्हिडिओ

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'gungun_dutta1138' या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. ६ दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ६५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. "ही घटना खरंच खूप भयानक होती," असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलं, "सार्वजनिक ठिकाणी पुरुष खूपच निर्धास्त असतात." दुसऱ्याने लिहिलं, "याची हिंमत तर बघा, याला अटक झाली की नक्की सांगा." आणखी एकाने म्हटलं, "हे खूपच भयानक आहे!" तर एका युजरने संताप व्यक्त करत लिहिलं, "आता सरकार रेल्वे स्टेशनही बंद करेल, कारण ते अशा लोकांना थांबवू शकत नाहीत, त्यामुळे ते आम्हाला म्हणजेच महिलांनाच थांबवतील."