Changrabandha Border: सध्याच्या बांगलादेशच्या (Bangladesh) परिस्थितीमुळे कूचबिहारमधील (Cooch Behar) चेंग्राबंदा सीमा खूप संवेदनशील झाली आहे. तिथेच एका संशयित बांगलादेशी तरुणाला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या भूमिकेची कसून चौकशी सुरू झाली आहे.
India-Bangladesh Border: उत्तर बंगालच्या (North Bengal) सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. टुरिस्ट व्हिसावर भारतात येऊन उत्तर बंगालमधील महत्त्वाच्या ठिकाणी फिरणे आणि लष्करी तळांची माहिती गोळा केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका बांगलादेशी (Bangladeshi) तरुणाला अटक केली आहे. गुरुवारी संध्याकाळी चेंग्राबंदा (Changrabandha) आंतरराष्ट्रीय इमिग्रेशन चेकपोस्टवरून त्याला ताब्यात घेण्यात आलं. मोहम्मद सलीम (३०) असं या तरुणाचं नाव आहे. तो बांगलादेशातील कुरीग्राम जिल्ह्याचा रहिवासी असल्याचं समजतं. काही दिवसांपूर्वीच तो टुरिस्ट व्हिसावर भारतात आला होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. गुरुवारी तो आपल्या देशात परत जाण्यासाठी चेंग्राबंदा सीमेवर पोहोचला, तेव्हाच त्याला पकडण्यात आलं.
अटक केलेल्या बांगलादेशी तरुणाची चौकशी
केंद्रीय गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, या बांगलादेशी तरुणाच्या हालचालींवर गेल्या काही दिवसांपासून लक्ष ठेवलं जात होतं. आता त्याला मेखलीगंज पोलिस ठाण्यात ठेवून त्याची कसून चौकशी केली जात आहे. भारतात असताना त्याने दार्जिलिंगमधील (Darjeeling) पर्यटन स्थळांना भेट दिलीच, पण सोबत उत्तर बंगालच्या महत्त्वाच्या लष्करी तळांची माहितीही गोळा केली असावी, असा संशय गुप्तचर संस्थांना आहे. विशेषतः बागडोगरा (Bagdogra) एअरबेस आणि हाशिमारा (Hasimara) एअरफोर्स स्टेशनच्या आजूबाजूला तो फिरताना दिसल्याने संशय बळावला आहे. अर्थात, या आरोपांची अद्याप चौकशी सुरू आहे. या तरुणाकडून एक व्हिजिटिंग कार्ड जप्त करण्यात आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या कार्डवर 'अनिल असगर कल्होरो' या व्यक्तीचं नाव आहे. ही व्यक्ती पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआयचा (ISI) वरिष्ठ अधिकारी असल्याचा संशय आहे आणि ती सध्या बांगलादेशात असावी, असा अंदाज आहे. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
एनआयए आणि आयबी करणार चौकशी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बांगलादेशी तरुणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency) आणि इंटेलिजन्स ब्युरोचे (Intelligence Bureau) अधिकारीही येणार आहेत. या तरुणाचा एखाद्या आंतरराष्ट्रीय गुप्तचर रॅकेटशी संबंध आहे का, भारतात येण्यामागचा त्याचा खरा उद्देश काय होता आणि त्याने उत्तर बंगालच्या लष्करी तळांबद्दल काही माहिती लीक केली आहे का, या सगळ्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. उत्तर बंगालचं भौगोलिक महत्त्व आणि तिथले लष्करी तळ पाहता, ही घटना सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर मानली जात आहे. मात्र, चौकशीनंतरच या आरोपांमधील तथ्य समोर येईल.















