राजस्थानमध्ये एका विशेष न्यायालयाने सुमन नावाच्या तरुणीच्या हत्येप्रकरणी एकाच कुटुंबातील ४ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रियकर प्रधानकडे तिने लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे तिला गावी बोलावून विष पाजण्यात आलं आणि सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा बनाव रचला गेला. शवविच्छेदन अहवालातून या हत्येचा उलगडा झाला.
राजस्थान: राजस्थानमध्ये एका तरुण मुलीच्या हत्येप्रकरणी एकाच कुटुंबातील चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टोंक येथील विशेष SC/ST न्यायालयाने २५ वर्षीय सुमनच्या हत्येचा कट रचल्याबद्दल एका महिलेसह तिच्या दोन मुलांना आणि मुलीला ही शिक्षा दिली. सुमनचे यातील एक आरोपी प्रधान याच्यासोबत प्रेमसंबंध होते. न्यायालयाने या चारही दोषींना मिळून १.३५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
लग्नाचा तगादा लावल्याने प्रेयसीची हत्या
सुमन आणि प्रधान दोघेही जयपूरमध्ये राहायचे, पण ते मूळचे टोंक जिल्ह्याचे होते. सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचे प्रेमसंबंध होते. पण जेव्हा सुमनने प्रधानकडे लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाले. 'दोघांची जात वेगळी असल्याने' प्रधान लग्नाचा विषय टाळत होता. आज तकच्या एका वृत्तानुसार, २०२२ मध्ये प्रधानने त्याची आई संजना, भाऊ सवाई राम आणि बहीण सुशीला यांच्यासोबत मिळून सुमनला संपवण्याचा कट रचला.
श्राद्धाच्या कार्यक्रमाचं निमित्त सांगून सुमनला त्यांच्या गावी बोलावण्यात आलं. तिथे तिला विषारी रसायन पाजण्यात आलं.
तीन दिवसांनंतर प्रधानने सुमनच्या भावाला तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आणि त्याला अजमेरला बोलावून घेतलं. पण तोपर्यंत सुमनचा मृत्यू झाला होता. तिला साप चावल्याने तिचा मृत्यू झाला, असा बनाव रचून तिच्या कुटुंबीयांची दिशाभूल करण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये तिच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले.
शवविच्छेदन अहवालातून हत्येचा उलगडा
सुमनचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यावर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. विषारी रसायन प्यायल्याने तिचा मृत्यू झाल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं.
सुमनच्या एटीएम कार्डचा वापर करून तिच्या बँक खात्यातून सुमारे ८० हजार रुपये काढण्यात आल्याचं तपासात उघड झालं. त्यानंतर पोलिसांचा प्रधानवरचा संशय बळावला. मे २०२३ मध्ये सुमनच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिच्या मृत्यूच्या कारणांचा सखोल तपास सुरू केला.
सुमनने लग्नासाठी हट्ट धरल्यामुळेच तिची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी केला.
२७ साक्षीदारांच्या जबाबावर न्यायालयाचा निकाल
विशेष न्यायाधीश आरती माहेश्वरी यांनी खटल्यादरम्यान सादर करण्यात आलेले २७ साक्षीदारांचे जबाब आणि ३७ कागदपत्रांच्या आधारे हा निकाल दिला. न्यायालयाने संजना, तिची मुलं प्रधान आणि सवाई राम, तसेच मुलगी सुशीला यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
संजना आणि सवाई राम हे दोघे आधीच जयपूरमध्ये न्यायालयीन कोठडीत होते. संजनाचा पती जगदीश याच्या हत्येप्रकरणी त्यांना अटक झाली होती. सुमन हत्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्यांना प्रॉडक्शन वॉरंटवर टोंकमध्ये आणण्यात आलं होतं.
त्या दुसऱ्या प्रकरणात, जगदीशच्या दारू पिण्याच्या सवयीवरून आणि वागणुकीवरून झालेल्या वादानंतर संजना आणि सवाई राम यांनी कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता.
