Pune Acid Attack : पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलगा झाला नाही या रागातून एका पतीने आपल्या पत्नीवर टॉयलेट क्लिनिंग ॲसिडने हल्ला केला. अनेक आठवड्यांनंतर पत्नीने तिथून सुटका करून घेत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Pune Acid Attack : पुणे ग्रामीण पोलिसांनी एका ३० वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या पत्नीच्या गुप्तांगावर टॉयलेट क्लिनिंग ॲसिड ओतून तिला गंभीर जखमी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ही धक्कादायक घटना २० एप्रिल रोजी हवेली तालुक्यातील एका गावात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला दोन मुली आहेत. त्याला मुलगा हवा होता. पत्नीला मुलगा होत नाही आणि तिचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा आरोप करत त्याने हा हल्ला केला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

अखेर पीडितेची सुटका

पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, पतीने आधी ॲसिड ओतण्याची धमकी दिली आणि नंतर हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तिने उपचारासाठी गयावया केली, पण पतीने तिला दवाखान्यात नेलं नाही. इतकंच नाही, तर तिला माहेरी जाण्यापासूनही रोखलं.

९ मे रोजी पती कामावर गेला असताना, पीडित महिला आपल्या मुलींना घेऊन सोलापूर तालुक्यातील तिच्या माहेरी पळून गेली. तिथे तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर १४ मे रोजी तिने पुणे ग्रामीण पोलिसांकडे धाव घेतली. वैद्यकीय तपासणीनंतर १५ मे रोजी औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी हवेली तालुक्यात एका फॅब्रिकेशन युनिटमध्ये वेल्डर म्हणून काम करतो. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५ (स्वेच्छेने दुखापत पोहोचवणे) आणि १२४ (ॲसिड वापरून गंभीर दुखापत पोहोचवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.