नांदेडमध्ये भरदिवसा तरुणीला रेल्वे स्थानकातून उचलून नेल्याचा प्रकार घडला. सदर घडनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत प्रकरणाचा तपास सुरू केला.

मुंबई : नांदेड शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा दोन तरुणांनी एका तरुणीला जबरदस्तीने उचलून नेताना दिसत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून दुसऱ्याची देखील ओखळ पटली आहे. 

दुचाकीवरून जबरदस्तीने अपहरण?

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की, एक तरुण दुचाकी घेऊन तयार उभा होता, तर दुसऱ्याने तरुणीला रस्त्यावरून ओढत आणलं आणि जबरदस्तीने दुचाकीवर बसवून तिला घेऊन पळून गेला. ही घटना घडत असतानाच काही लोक दूरून पाहताना देखील दिसतात, मात्र कोणतीही मदत करताना दिसत नाही.

पोलिसांनी तातडीने घेतली दखल

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केल्यानंतर नांदेड पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे. संबंधित व्हिडीओच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं होत. यानुसार एकाला अटक करण्यात आली असून दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे. सदर पीडित तरुणी रेल्वे परिसरातच राहते अशीही माहिती पोलिसांनी दिली. 

नांदेडकरांमध्ये भीतीचे वातावरण

या प्रकारामुळे नांदेडकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सार्वजनिक ठिकाणी, तेही दिवसा, अशा प्रकारे एखाद्या मुलीचं अपहरण होणं ही अतिशय गंभीर बाब मानली जात आहे. स्त्रियांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सोशल मीडियावर नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत असून, पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

व्हिडीओ व्हायरलचा परिणाम

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार अधिक गाजू लागला आहे. अनेकांनी याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना टॅग करून कठोर कारवाईची मागणी** केली. यासंदर्भात सध्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.