दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने एका ४५ वर्षीय बापाने आपल्या २० वर्षांच्या मुलीच्या चिकन बिर्याणीत विष कालवून तिची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.
मुंबई : दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने एका ४५ वर्षीय बापाने आपल्या २० वर्षांच्या मुलीच्या चिकन बिर्याणीत विष कालवून तिची गळा दाबून हत्या केली. शरीफ रझा हुसेन खान असं या आरोपीचं नाव असून तो सुतारकाम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीफचा त्याच्या धाकट्या मुलीलाही मारण्याचा कट होता. पण ती रात्री तिच्या काकांच्या घरी झोपायला गेल्याने या कटातून थोडक्यात बचावली.
ही धक्कादायक घटना २ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या वडाळा परिसरात घडली. वडाळा पोलिसांनी बुधवारी शरीफला त्याची मुलगी रिफत हिच्या हत्येप्रकरणी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी सांगितलं की, शरीफने या हत्येला 'फूड पॉयझनिंग' (अन्नातून विषबाधा) झाल्याचा बनाव रचला होता. पण वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांना रिफतच्या गळ्यावर फास आवळल्याच्या खुणा दिसल्या. त्यामुळे संशय वाढला आणि अखेर शरीफचं बिंग फुटलं.
मुलींचा बापाच्या दुसऱ्या लग्नाला विरोध
वडाळा पूर्व येथील शेख मिस्त्री दर्गा रोडवरील मॅडोना कॉलनीत शरीफ त्याच्या दोन मुली (२० वर्षीय रिफत आणि १६ वर्षीय नुझहत) आणि १० वर्षांचा मुलगा अहमद यांच्यासोबत राहायचा. नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांच्या आईचं कॅन्सरने निधन झालं होतं.
पत्नीच्या मृत्यूनंतर शरीफने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण रिफत आणि नुझहत या दोघींचाही याला कडाडून विरोध होता. यावरून घरात रोज वाद व्हायचे. विशेषतः रिफतचा बापाच्या दुसऱ्या लग्नाला सक्त विरोध होता, असं पोलिसांनी सांगितलं. दुसऱ्या लग्नावरून घरात सुरू असलेल्या याच वादामधून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.
बिर्याणी खाल्ल्यानंतर मुलीचा मृत्यू
२ ऑक्टोबर रोजी रिफतचे मामा अबू खान लुधियानामध्ये होते, तेव्हा त्यांना फोनवरून रिफतच्या मृत्यूची बातमी समजली. त्यांना सांगण्यात आलं की, रिफत आणि नुझहत यांनी रात्री वडिलांनी आणलेली चिकन बिर्याणी खाल्ली आणि त्या गच्चीवर झोपायला गेल्या.
पण उकाडा जास्त असल्याने नुझहत तिची आत्या गौसिया हिच्या घरी झोपायला गेली. नुझहतच्या या एका निर्णयामुळे तिचा जीव वाचला, कारण आरोपी बापाचा तिलाही संपवण्याचा डाव होता, असा पोलिसांचा अंदाज आहे.
३ ऑक्टोबरला पहाटे ५ च्या सुमारास शरीफ गौसियाच्या घरी गेला आणि त्याने रिफत काहीच हालचाल करत नसल्याचं सांगितलं. नातेवाईकांनी तातडीने तिला रुग्णालयात नेलं, पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
शवविच्छेदन अहवालातून सत्य उघड
रिफतच्या मृत्यूबाबत सुरुवातीपासूनच संशय होता. त्यातच डॉक्टरांना तिच्या गळ्यावर फास आवळल्याच्या खुणा दिसल्याने हा संशय अधिक बळावला. एका पोलीस अधिकाऱ्याने शरीफचं संशयास्पद वागणं आणि वैद्यकीय अहवालाबाबत माहिती दिली.
"शरीफचं वागणं खूप विचित्र होतं. त्याने तिला केईएम (KEM) रुग्णालयात नेलं. हे पोलिसांचं प्रकरण असल्याने डॉक्टरांनी शवविच्छेदन केलं. त्यात गळा दाबल्यामुळे श्वास कोंडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. पुढील तपासणीसाठी आणि रासायनिक विश्लेषणासाठी नमुने राखून ठेवण्यात आले आहेत," असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. मृत्यूची परिस्थिती आणि शवविच्छेदन अहवालातील पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी शरीफ रझा हुसेन खान याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


