कुवेतच्या अब्दाली रोडवर कामगारांना घेऊन जाणारी बस उलटून २२ जण जखमी झाले आहेत. काल सकाळी ही घटना घडली. माहिती मिळताच पोलीस आणि वैद्यकीय पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
कुवेत सिटी: कुवेतच्या अब्दाली रोडवर कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला आणि लोखंडी कुंपणाला धडकून उलटली. या भीषण अपघातात २२ प्रवासी कामगार जखमी झाले आहेत. सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कामगारांना गंभीर दुखापत झाली असून काहींची हाडे मोडली आहेत.
काल सकाळी गृह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला या अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर लगेचच पोलीस गस्ती पथक, वाहतूक पोलीस आणि आपत्कालीन वैद्यकीय पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य करत सर्व जखमी कामगारांना रुग्णवाहिकेतून 'जाहरा' (Jahra) रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश जखमींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मात्र, तीन कामगारांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर विशेष वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस आणि बचाव पथकासोबतच संबंधित कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजरही उपस्थित होते. या अपघाताचे नेमकं कारण काय, याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने अधिकृत तपास सुरू केला आहे.
