उत्तर प्रदेशच्या मथुरेत एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. २८ जून रोजी तिने आपल्या तीन वर्षांच्या मुलाचा गळा दाबून जीव घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. काही आठवड्यांनंतर, नवऱ्याने तिला फोनवर दुसऱ्या पुरुषासोबत मुलाच्या मृत्यूविषयी बोलताना ऐकलं आणि हे प्रकरण उघडकीस आलं. पोलीस आता पोस्टमॉर्टमसाठी मुलाचा मृतदेह बाहेर काढणार आहेत.
उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यात एका ३२ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. 'बॉयफ्रेंड'सोबत फोनवर बोलत असताना तिचा तीन वर्षांचा मुलगा सतत रडत होता, म्हणून तिने त्याचा गळा दाबून जीव घेतल्याचा आरोप आहे.
ही धक्कादायक घटना २८ जून रोजी बलदेव पोलीस स्टेशन हद्दीतील छौली गावात घडली. पण, अनेक आठवड्यांनंतर हे प्रकरण उघडकीस आलं. महिलेच्या नवऱ्याने तिला फोनवर मुलाच्या मृत्यूविषयी बोलताना ऐकलं. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, पोस्टमॉर्टमसाठी मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात येणार आहे, असं पीटीआय या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.
मुलगा आजारी पडल्यानंतर रुग्णालयात नेलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वडील कृष्ण मुरारी गुप्ता यांचं मेडिकल दुकान आहे. २८ जून रोजी ते कामावर असताना त्यांची पत्नी रुची जिंदल हिचा फोन आला. मुलगा सतत रडल्यामुळे आजारी पडला असून तो काहीच हालचाल करत नाहीये, असं तिने सांगितलं.
कुटुंबीयांनी मुलाला तातडीने अनेक डॉक्टरांकडे नेलं, पण अखेर मथुरमधील एका खासगी रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आलं.
त्या दिवशी मुलाला पोलिओचे थेंब दिले होते, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा, असा सुरुवातीला कुटुंबाचा समज होता. त्यामुळे कोणताही संशय न घेता त्यांनी मुलाच्या मृतदेहावर दफनविधी केला.
पतीने फोनवरील संभाषण ऐकलं
सोमवारी या प्रकरणात एक अनपेक्षित वळण आलं. कृष्ण मुरारी यांनी त्यांची पत्नी रुचीला फोनवर एका दुसऱ्या पुरुषासोबत मुलाच्या मृत्यूविषयी बोलताना ऐकलं.
त्यांनी तिला याबाबत जाब विचारला असता, तिने कुटुंबियांसमोर आणि पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केल्याचं सांगितलं जातंय.
यानंतर, महिलेचा दीर गोविंद गुप्ता यांनी तिच्या फोनचे कॉल रेकॉर्ड तपासले. तेव्हा ती त्या व्यक्तीसोबत सतत आणि तासनतास बोलत असल्याचे समोर आलं.
आता पोलीस या कथित संबंधांबद्दल आणि मुलाच्या मृत्यूशी त्याचा काही संबंध आहे का, याचा तपास करत आहेत.
पोलीस मुलाचा मृतदेह बाहेर काढणार
बलदेव पोलीस स्टेशनचे अधिकारी अजय शर्मा यांनी सांगितलं की, गोविंद गुप्ता यांच्या तक्रारीवरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोस्टमॉर्टमच्या अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असंही त्यांनी पीटीआयला सांगितलं.
पोलीस उपअधीक्षक (महावन) संजीव कुमार राय यांनीही मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बाहेर काढण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं.
या तपासाचा भाग म्हणून पोलीस वैद्यकीय पुरावे आणि कुटुंबीयांचे जबाब तपासणार आहेत. पोस्टमॉर्टमचा अहवाल आणि तपासात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
(एजन्सीच्या माहितीसह)


