Twisha Sharma Case : त्विशा शर्मा मृत्यूप्रकरणी अनेक खुलासे होत आहेत. आता सीबीआय तपासात तिच्या २० लाखांच्या डिमॅट अकाऊंटबाबत तसंच तिच्या एका कॉलबाबत समोर आलं आहे.
भोपाळ : त्विशा शर्मा मृत्यूप्रकरणी सीबीआय आरोपपत्रात अनेक खुलासे समोर आले आहेत. एका आर्थिक गोष्टीतून या तपासाला एक गंभीर वळण लागलं आहे. आरोपपत्रानुसार, त्विशाच्या डीमॅट खात्यात जवळपास २० लाख रुपयांची इक्विटी गुंतवणूक होती. या पैशांवर आरोपी पती समर्थ सिंग आणि त्याची आई गिरीबाला सिंग यांची या पैशांवर नजर होती. त्विशाची ही रक्कम, गुंतवणूक आपल्याला मिळावी यासाठी त्विशावर दबाव टाकण्यात येत होता, असा दावा तपासादरम्यान सीबीआयने केला आहे.
सीबीआयच्या तपासानुसार, समर्थ सिंगला त्विशाची ही २० लाखांची गुंतवणूक चिनी शेअर बाजारात गुंतवायची होती. तसा त्याचा प्लॅन होता. पण त्विशाने तसं करण्यास नकार दिला होता, अशी माहिती तपास यंत्रणांना तपासादरम्यान मिळाली आहे. आरोपपत्रात नमूद केल्यानुसार, २० लाखांची रक्कम आपल्या वडिलांची असल्याचं तिने समर्थ सिंग आणि त्याच्या कुटुंबियांना सांगितलं होतं आणि ती रक्कम समर्थला देण्यास नकार दिला होता. तपासादरम्यान असंही समोर आलं की, ७ एप्रिल २०२६ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बागमुगलिया शाखेत समर्थ आणि त्विशा या दोघांनी त्यांच्या नावाने एक जॉईंट अकाऊंट उघडलं होतं.
याप्रकरणात त्विशाचा तिच्या मैत्रिणीसोबत झालेला कॉलदेखील महत्त्वाचा ठरला आहे. १२ मे २०२६ रोजी संध्याकाळी ७.५१ च्या सुमारास त्विशाने तिच्या मैत्रिणीला राशी अब्रोलला कॉल केला होता. या कॉलवर बोलताना त्विशाने आपण परतण्याचा निर्णय घेत असल्याचं सांगितलं होतं. तसंच कॉलवर तिने मैत्रिणीला हेदेखील सांगितलं होतं, की समर्थ सिंग तिच्याकडील गुंतवणूक त्याच्याकडे मागत आहे, आणि ही रक्कम त्याला चिनी शेअर बाजारात गुंतवायची आहे. याच कॉलनंतर दुसऱ्या दिवशी १३ मे रोजी त्विशाचा मृत्यू झाला.
त्विशाचे वडील नवनिधी शर्मा यांनीही आर्थिक दबाव असल्याची बाब पोलीस तपासात सांगितली आहे. लग्नानंतर काही दिवसांतच समर्थने तिच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. चिनी शेअर बाजारात हे पैसे दुप्पट होतील असा त्याचा दावा होता, असंही ते म्हणाले. समर्थ आणि त्याची आई अर्थात त्विशाची सासू दोघेही तिला पैशांसाठी दबाव टाकत होते, असा आरोप त्विशाच्या कुटुंबियांनी केला आहे.
त्विशाच्या कुटुंबियांनी तपासात अशीही माहिती दिली, की त्विशाचा मानसिक छळ केला जात होता. तिची नोकरी गेली होती. त्यामुळे समर्थ तिला टोमणे मारायचा, थट्टा करायचा. तसंच सासरी तिच्यावर पाळत ठेवली जात होती, या सर्व प्रकारामुळे आपण दबावाखाली असल्याचं त्विशाने मृत्यूआधी तिच्या घरी सांगितलं होतं.
त्विशाच्या मृत्यूप्रकरणी आता तिचं २० लाखांचं डिमॅट अकाऊंट, आर्थिक मागण्या, हुंड्यासंबंधित बाबी अशा विविध बाजूंनी तपास सुरू आहे. त्विशाचा मोबाईल याप्रकरणी सर्वात मोठा पुरावा ठरू शकतो. मोबाईलमधून आरोपीविरोधात अधिक माहिती मिळू शकते.


