Junnar Couple ends life: जुन्नर तालुक्यातील कोकणकड्याच्या दरीत एका पुरुष आणि तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती तलाठी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी असल्याचे ओळखले गेले आहे. प्राथमिक अंदाजानुसार आत्महत्या असल्याचे बोलले जात आहे.

जुन्नर: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिवासी भागातील दुर्गावाडी येथील प्रसिद्ध कोकणकड्याच्या १२ फूट खोल दरीत चाळीस वर्षीय तलाठी आणि एका महाविद्यालयीन तरुणीचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे दोघेही बेपत्ता होते आणि त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत व्यक्तींची ओळख रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) आणि रुपाली संतोष खुटाण (आंबोली, ता. जुन्नर) अशी पटली आहे. जुन्नर पोलिसांनी आणि स्थानिक बचाव पथकाने प्रतिकूल परिस्थितीत हे मृतदेह दरीतून बाहेर काढले.

नेमकं काय घडलं?

रामचंद्र पारधी हे मूळचे दुर्गावाडीचे असून, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते, ज्याबाबत त्यांच्या पत्नीने अहमदनगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. दुसरीकडे, महाविद्यालयीन युवती रुपाली खुटाण देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल होता.

पांढऱ्या गाडीमुळे उलगडले रहस्य!

स्थानिक ग्रामस्थांना जुन्नरच्या रिव्हर्स वॉटरफॉलजवळ एक पांढऱ्या रंगाची कार अनेक दिवसांपासून उभी दिसली. यानंतर संशय आल्याने स्थानिकांनी शोध घेतला असता, कड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळून आल्या. रविवार, २२ जून रोजी दाट धुके, पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. मात्र, सोमवार, २३ जून रोजी सकाळी बचाव पथकाने दरीत उतरून शोध घेतला असता, रुपाली आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आले.

जुन्नर रेस्क्यू टीमचे रुपेश जगताप, राजकुमार चव्हाण आणि पोलिस कर्मचारी रघुनाथ शिंदे, गणेश शिंदे, दादा पावडे यांनी हे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. जुन्नर पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, ज्यात आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.