सार

पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ असणाऱ्या जगदंब हॉटेलमध्ये अविनाश बाळू धनवे या तरुणाचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता.या प्रकरणाचा उलगडा झाला असून ग्रामीण पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे. 

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ असणाऱ्या जगदंब हॉटेलमध्ये अविनाश बाळू धनवे (वय ३१) या तरुणाचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या हत्येची नोंद सीसीटीव्हीमध्ये झाली त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले असून चार आरोपींना अटक केली आहे. तुरुंगात झालेल्या मारहाणीचा बदला म्हणून आरोपींनी अविनाश धनवे याचा खून केल्याचे आता तपासात निष्पन्न झाले आहे.

शिवाजी बाबुराव भेंडेकर (वय ३५), मयूर उर्फ बाळा मुकेश पाटोळे (वय २०) सतीश उर्फ सला उपेंद्र पांडे (वय २०) आणि सोमनाथ विश्वंभर भत्ते (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आणखीन चार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की,अविनाश धनवे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याची आळंदी आणि चरोली परिसरात दहशत होती.आळंदी परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांसोबत त्याचे वैमनस्य होते. त्याच्याविरोधात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सहा गुन्हे दाखल आहेत. २०२० मध्ये त्याच्या विरोधात मोक्का लावण्यात आला होता. तेव्हापासून तो तुरुंगात होता. फेब्रुवारी महिन्यात तो तुरुंगातून सुटका झाली होती. तर आरोपी शिवाजी भेंडेकर हा देखील खुनाच्या गुन्ह्यात २०१२ पासून तुरुंगात होता. २०२२ मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगात असताना धनवे यांनी शिवाजी भेंडेकर आणि मयूर उर्फ बाळा मुकेश पाटोळे याला मारहाण केली होती. याच मारहाणीचा बदला त्यांनी धनवेचा खून करून घेतलाय अशी माहिती आली आहे.

दरम्यान ज्या दिवशी अविनाश धनवे याचा खून झाला त्या दिवशी तो आळंदी येथून पंढरपूरला जाण्यासाठी निघाला होता. तेव्हापासूनच आरोपी त्याच्या मागावर होते. इंदापूर परिसरातील जगदंब हॉटेलवर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अविनाश धनवे आणि त्याचे मित्र जेवण करण्यासाठी थांबले होते. हीच संधी साधून आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. आरोपी मयूर उर्फ बाळा मुकेश पाटोळे यांनी सर्वात आधी अविनाशवर गोळी झाडली. त्याच्यावर एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्या. आणि त्यानंतर चार कोयत्याने वीस हुन अधिक वार करण्यात आले. डोक्यात गोळी लागल्याने अविनाश धनवेचा जागीच मृत्यू झाला होता.

आणखी वाचा :

Crime : बत्ती गुल होण्याच्या भीतीपोटी मुंबईतील नागरिकाने गमावले तीन लाख रुपये, वाचा संपूर्ण प्रकरण सविस्तर...

दहशतवादी कारवायांमध्ये वापरलेल्या स्थावर मालमत्ता एनआयएने केल्या जप्त

Amravati Bus Firing : अमरावती- नागपूर महामार्गावर खासगी बसवर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार, चालकाने हुशारी दाखवत वाचवले प्रवाशांचे प्राण