पनवेल रेल्वे स्थानकावरून ३६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी एका नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली आहे. मंगला एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेकडून २ किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे.

Mumbai: पनवेल रेल्वे स्थानकावर ३६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आलं आहे. रेल्वे क्रमांक 12618 'मंगला एक्सप्रेस'मध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांसह प्रवासी येत असल्याची माहिती एनसीबी बंगळूरूला मिळाली होती. गाडी पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर येताच पथकानं शोध मोहीम सुरु केली.

या शोध मोहिमेदरम्यान, कोच ए-2, सीट क्रमांक 27 वर एका बाळासह आणि बहुरंगी ट्रॅव्हल बॅग घेऊन जाणारी एक नायजेरियन महिला आढळली. चौकशीत तिनं स्वतःची ओळख एटुमुदोन डोरिस अशी करून दिली. या महिलेकडे A06895991 क्रमांकाचा नायजेरियन पासपोर्ट होता. त्या महिलेसोबत एक लहान मुलं होत आणि तिने ओळख करून देताना ते आपलं असल्याची माहिती दिली.

महिलेची कसून चौकशी करण्यात आली 

महिलेची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिच्या बॅगमध्ये व्हिंटेज या नावासोबत दोन रबर मटेरिअलमध्ये गुंढाळलेले काळे पॅकेजेस दिसून आले. ते उघडल्यानंतर आतमध्ये पांढऱ्या पावडरची दोन पॅकेट दिसून आली. ते उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये कोकेन असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले. तब्बल 2.002 किलो कोकेन या महिलेकडून हस्तगत करण्यात आलं आहे. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 36 कोटी रूपये इतकी आहे.

पोलीस करणार तपास 

पहिल्या घटनेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) बंगळुरू, रेल्वे संरक्षण दल (RPF) पनवेल आणि गुन्हे गुप्तचर शाखा (CIB) कुर्ला यांनी संयुक्तपणे एका महिलेला अटक केली. रेल्वेमार्गे अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई पार पडली. संबंधित महिलेविरुद्ध NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ती कोणासाठी हे पॅकेट घेऊन चालली होती, तिला कुणाकडून ते मिळालं, हे पॅकेट पुढे कुणाला द्यायचं होतं – याचा तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणातून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा मोठा तपशील उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.