नेदुंबसेरीमध्ये तीन जणांचा बळी घेणाऱ्या मिनी कूपर अपघातात कारचा वेग प्रचंड होता, असा खुलासा BMW च्या टेक्निकल रिपोर्टमध्ये झाला आहे. अपघाताच्या वेळी कार १४४ किमी प्रति तास वेगाने धावत होती आणि चालकाने दारू प्यायली होती, हे तपासात स्पष्ट झालंय.

कोची: संपूर्ण केरळला हादरवून सोडणाऱ्या नेदुंबसेरी मिनी कूपर अपघातात कारचा वेग खूप जास्त होता, यावर आता कार कंपनी BMW ने शिक्कामोर्तब केलं आहे. अपघाताच्या अवघ्या ५ सेकंद आधी कारचा वेग १६२ किमी प्रति तास होता. तर धडक बसली तेव्हा कार १४४ किमी वेगाने धावत होती. अपघाताच्या फक्त एक सेकंद आधी ब्रेक दाबण्यात आला होता, अशी माहिती BMW ने तपास यंत्रणांना दिलेल्या टेक्निकल रिपोर्टमध्ये आहे. या प्रकरणातील क्रॅश डेटा रिपोर्ट खूप महत्त्वाचा मानला जातोय.

या तपासासाठी दिल्लीहून खास तांत्रिक तज्ज्ञांची टीम आली होती. अपघाताच्या वेळी कारचे ब्रेक दाबले गेले होते का, हे तपासण्यासाठी ही चाचणी करण्यात आली. यामुळे पोलिसांच्या आरोपपत्राला मोठी ताकद मिळणार आहे. या नव्या माहितीमुळे सुहैल सजीवच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी आधीच कार ओव्हरस्पीड असल्याचा अंदाज वर्तवला होता. आता कार कंपनीच्या रिपोर्टमुळे यावर वैज्ञानिक मोहोर उमटली आहे. वाहनाच्या 'अॅडव्हान्स्ड क्रॅश सेफ्टी मॉड्यूल'मधून मिळालेल्या डेटाच्या आधारे कंपनीने हा रिपोर्ट तयार केला आहे.

हा भीषण अपघात ११ ऑक्टोबरला पहाटे १.४५ वाजता नेदुंबसेरी एअरपोर्ट रोडवर झाला होता. मुख्य आरोपी सुहैल सजीव याने दारूच्या नशेत कार चालवत तिघांना उडवलं होतं. वायनाडच्या मडक्कीमला येथील देविका संतोष, पालक्काडच्या मन्नारक्कड येथील गोपिका आणि कर्नाटकातील सुळ्या येथील इयास हे तिघे स्कूटरवरून जात असताना कारने त्यांना धडक दिली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. कार चालवणारा सुहैल सजीव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांवर गुन्ह्याला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आरोपी दारूच्या नशेत होते आणि कारचा वेग प्रचंड होता, हे पोलीस आणि सरकारी वकिलांच्या तपासात आधीच स्पष्ट झालं होतं. दरम्यान, सुहैलच्या जामीन अर्जावर उद्या उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तपास आणि चौकशी पूर्ण झाल्याने आपल्याला जामीन मिळावा, अशी मागणी त्याने केली आहे.