पती रात्री घरी आला नाही म्हणून रागाच्या भरात एका महिलेने आपल्या दोन मुलींचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यात घडली आहे. तिसऱ्या मुलीलाही तिने मारण्याचा प्रयत्न केला, पण ती मुलगी पळून जाण्यात यशस्वी ठरली. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पती रात्री घरी न आल्याने रागावलेल्या एका महिलेने आपल्या दोन मुलींचा गळा दाबून खून केल्याचा भयंकर प्रकार बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात घडला आहे. मोतीहारीमधील डुमरियाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सेमुआपुर गावात ही घटना घडली. घरातच १३ आणि ११ वर्षांच्या दोन मुलींचे मृतदेह आढळले. आज तकच्या वृत्तानुसार, नवरा रात्री घरी आला नाही म्हणून आलेल्या रागातून या महिलेने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे. आईने तिसऱ्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न केला, पण ती तिथून पळ काढण्यात यशस्वी ठरली.
घरातच सापडले दोन बहिणींचे मृतदेह
घरात दोन बहिणींचे मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला या मृत्यूंबद्दल संशय व्यक्त केला जात होता. विषबाधा किंवा इतर काही कारणांनी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता.
मुलींच्या तोंडातून फेस येत असल्याने, त्यांना विष दिलं गेलं असावं का, यादृष्टीनेही पोलीस तपास करत होते.
या घटनेची माहिती मिळताच डुमरियाघाट पोलीस गावात पोहोचले. गुन्हेगारी स्थळाची पाहणी करण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (FSL) टीमलाही बोलावण्यात आलं.
पोलिसांनी आधी वडिलांची चौकशी केली
तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मुलींची आई घरातून बेपत्ता असल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी पोलिसांनी चौकशीसाठी मुलींच्या वडिलांना ताब्यात घेतलं होतं.
पण पोलिसांनी फक्त याच माहितीवर अवलंबून न राहता तांत्रिक पुरावे आणि इतर धागेदोरे तपासण्याचं काम सुरू ठेवलं.
तपास जसजसा पुढे गेला, तसतसा संशयाची सुई आईकडे वळू लागली. या दोन्ही मुलींचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं पोलिसांनी नंतर स्पष्ट केलं.
या महिलेने आपल्या तिसऱ्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न केल्याचं तपासात समोर आलं. पण सुदैवाने ती मुलगी तिथून पळून गेली आणि तिने स्वतःचा जीव वाचवला.
आईला अटक, तपास सुरू
आज तकने दिलेल्या माहितीनुसार, मोतीहारीचे प्रभारी पोलीस अधीक्षक मोहिबुल्लाह अन्सारी यांनी आरोपी महिलेला अटक केल्याची पुष्टी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरा रात्री घरी आला नाही म्हणून आलेल्या रागातून तिने हे हत्याकाडं रचल्याचं प्राथमिक तपासात दिसतंय. सध्या या महिलेची चौकशी सुरू असून, मृत्यूच्या नेमक्या कारणांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस आणखी पुरावे गोळा करत आहेत.
तिसरी मुलगी जिवंत राहिल्यामुळे या घटनेचा उलगडा होण्यास खूप मदत झाली.
या प्रकरणात पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.














