बंगळुरूच्या विल्सन गार्डन पोलिसांनी एका अशा हायटेक चोराला अटक केली आहे, जो थेट विमानाने येऊन बंद घरांमध्ये चोरी करायचा. हैदराबादच्या या चोराची कहाणी ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.

बंगळुरू: बंगळुरूच्या विल्सन गार्डन पोलिसांनी एका हायटेक चोराला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याला अटक करून कसून चौकशी केली, तेव्हा अशी काही माहिती समोर आली की पोलीसही चक्रावून गेले. विनोद असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

हैदराबादचा राहणारा विनोद बंगळुरूमधील बंद घरांना टार्गेट करायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चोर अतिशय हुशार आहे. तो थेट विमानाने शहरात यायचा. त्यानंतर बंद घरे किंवा जिथे लोकांची जास्त ये-जा नाही, अशी घरे तो हेरून ठेवायचा. मग चोरीचा पक्का प्लॅन करून, सोनं आणि रोकड लुटायचा आणि पुन्हा विमानानेच पसार व्हायचा.

कसा अडकला जाळ्यात?

असाच त्याने विल्सन गार्डन परिसरातील एका बंद घराला टार्गेट केलं होतं. घराचं कुलूप तोडून त्याने आत एन्ट्री मारली. घरातून त्याने २७० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३०० अमेरिकन डॉलर्सची विदेशी रोकड चोरली आणि थेट विमानाने हैदराबादला पळून गेला. इकडे घरमालकाने चोरीची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या चोराचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अखेर या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

चौकशीत काय उघड झालं?

चोरीचा माल घेऊन आपण दिल्लीला गेल्याची कबुली त्याने दिली. दिल्लीत त्याने विदेशी चलनाला भारतीय रुपयात बदलून घेतलं आणि सोन्याचे दागिने विकून पैसे मिळवले. पोलिसांनी जेव्हा त्याची आणखी सखोल चौकशी केली, तेव्हा विनोद हा सराईत गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालं. याआधीही त्याच्यावर वेगवेगळ्या राज्यांत आणि शहरांमध्ये तब्बल ३० हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सध्या पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल ४२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि उरलेल्या ३० विदेशी डॉलरच्या नोटा जप्त केल्या आहेत. या हायटेक चोराला अटक केल्यानंतर पोलीस आता आणखी तपास करत आहेत. विमानाने येऊन चोरी करणाऱ्या या चोराला बंगळुरूत कोणी मदत करत होतं का? यामागे आणखी कोणाचा हात आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

आता सणासुदीचा काळ जवळ येत आहे. सणांसाठी अनेक जण आपल्या गावी जातात. बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये अशा चोऱ्या होणं सामान्य बाब झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर जास्त दिवसांसाठी घराबाहेर जाणार असाल, तर घराला व्यवस्थित कुलूप लावूनच बाहेर पडा. एकदा चोरी झाली की वस्तू परत मिळेलच किंवा चोर सापडेलच, याची कोणतीही शाश्वती नसते.