पाकिस्तानच्या लाहोरमधील शहादरा भागात भरधाव जाफर एक्सप्रेसने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. दुसऱ्या ट्रेनमुळे उडालेल्या धुळीत त्याला ही ट्रेन दिसलीच नाही. या धडकेत त्याची दुचाकी इंजिनाखाली चिरडली गेली. या अपघातात दुचाकीस्वार बचावला की नाही, याबाबत परस्परविरोधी दावे केले जात आहेत.
पाकिस्तानच्या लाहोर जवळील शहादरा भागात एक थरारक रेल्वे अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पाकिस्तानमध्ये २० नोव्हेंबर, शुक्रवारी हा भयंकर प्रकार घडला. पहिल्या ट्रेनच्या वेगामुळे उडालेल्या धुळीमुळे दुसऱ्या ट्रॅकवर येणारी भरधाव ट्रेन एका दुचाकीस्वाराला दिसली नाही आणि त्याला ट्रेनने थेट उडवलं.
एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि इतर सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यात दिसतंय की, पहिली ट्रेन गेल्यानंतर एक दुचाकीस्वार रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळी तिथे उडालेल्या धुळीच्या लोटामुळे त्याला शेजारच्या ट्रॅकवरून येणारी भरधाव जाफर एक्सप्रेस दिसलीच नाही. या ट्रेनने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि दुचाकी थेट इंजिनाखाली अडकली.
काही रिपोर्ट्नुसार, जाफर एक्सप्रेसखाली आल्याने दुचाकी चालवणाऱ्या माणसाचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या व्यक्तीची ओळख आणि त्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
लाहोरमध्ये हा भयंकर अपघात कसा घडला?
लाहोरच्या उत्तरेला रावी नदीच्या पलीकडे असणारा शहादरा भाग या घटनेमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या व्यस्त रेल्वे क्रॉसिंगवर कमी दृश्यमानता आणि अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने रोजच्या प्रवासाचा भयानक अंत झाला.
स्थानिक बातम्यांनुसार, शहादरामधील काला खटाई रोडवरील फाटक क्रमांक ९ वर हा अपघात झाला. दुचाकीस्वार रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना ४० डाऊन जाफर एक्सप्रेस तिथे आली. ही ट्रेन पेशावरवरून लाहोरमार्गे क्वेटाला जात होती. ट्रेन क्वेटाच्या दिशेने जात असतानाच दुचाकी इंजिनाखाली आली.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळीच्या लोटामुळे दुचाकीस्वाराला ट्रेन वेळेवर दिसली नाही आणि ट्रॅक ओलांडताना त्याला धडक बसली. त्याची गाडी इंजिनाखाली अडकली. ट्रेन थांबल्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी ती बाहेर काढली.
मात्र, या अपघातानंतर दुचाकीस्वाराची अवस्था काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, धडक लागताच तो ट्रॅकच्या बाजूला फेकला गेला आणि सुदैवाने बचावला, तर त्याची बाईक जाफर एक्सप्रेसखाली चिरडली गेली.
पण दुसरीकडे काही स्थानिक रिपोर्ट्सनुसार, या २३ वर्षीय तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूबाबत आणि वयाबाबत परस्परविरोधी बातम्या येत असून अद्याप याची पुष्टी झालेली नाही.
पाकिस्तानमधील अलीकडचे रेल्वे अपघात
शहादरामधील हा रेल्वे अपघात पाकिस्तानच्या रेल्वे नेटवर्कमधील सुरक्षिततेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकणारा ठरला आहे.
या घटनेच्या अवघ्या एक महिना आधी, ऑक्टोबरमध्ये कराची ते पेशावर जाणारी रहमान बाबा एक्सप्रेस मुलतानजवळ शेर शाह ब्रिजजवळ रुळावरून घसरली होती. या ट्रेनचे सर्व १४ डबे रुळावरून उतरले होते. या अपघातात ६ ते ७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे ४० जण जखमी झाले होते. प्राथमिक तपासानुसार, एका डब्यातील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला होता.
त्याआधी सप्टेंबरमध्ये सिंध प्रांतातील कोटरी रेल्वे यार्डजवळ कोळशाने भरलेल्या मालगाडीचे तीन डबे रुळावरून घसरले होते. यामुळे मालवाहतुकीवर परिणाम झाला होता. एका रिपोर्टनुसार, २०२६ या वर्षात पाकिस्तानच्या रेल्वे नेटवर्कवर ५५ हून अधिक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तान रेल्वेने ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ऑपरेशनल सेफ्टी इमर्जन्सी जाहीर केली आहे.
शहादराच्या काला खटाई रोडवरील फाटक क्रमांक ९ वरील या ताज्या अपघातानंतर, रेल्वे क्रॉसिंगवरील नियम कठोर करण्याची, चांगली वॉर्निंग सिस्टीम बसवण्याची आणि प्रवाशांनी अधिक काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे.










