बंगळुरूमध्ये एका बाईकस्वाराने कारचं नुकसान केल्यानंतर, CEO सिद्धार्थ दियालानी यांनी जेमिनी AI च्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. डॅशकॅम फुटेजमुळे पोलिसांना पुरावा मिळाला. पोलिसांनी बाईकस्वाराला शोधून काढलं, त्यानंतर त्याने लेखी माफी मागितली आणि कारच्या दुरुस्तीचा खर्चही दिला.

बाईकस्वाराची कारला धडक; CEO चा 'वकील' बनला जेमिनी!

बंगळुरू: बंगळुरूमध्ये घडलेली रोड रेजची एक घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 'भारतअ‍ॅग्री'चे संस्थापक आणि CEO सिद्धार्थ दियालानी यांच्या कारचं एका बाईकस्वाराने नुकसान केलं. यानंतर पोलिसांत तक्रार देण्यासाठी सिद्धार्थ यांनी गुगलच्या 'जेमिनी AI' ची मदत घेतली. विशेष म्हणजे, या प्रकरणात बाईकस्वाराने माफी मागून नुकसान भरपाई दिल्याने प्रकरणावर पडदा पडला.

सोनी सिग्नल ते एजीपुरा दरम्यान घडला प्रकार

सिद्धार्थ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी सिग्नल आणि एजीपुरा सिग्नलच्या दरम्यान हा प्रकार घडला. आपली कार बाईकला घासल्याचा गैरसमज बाईकस्वाराला झाला. रागाच्या भरात त्याने कार थांबवली आणि कारच्या दरवाजाला लाथ मारली.

तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने मागून कारला धडक दिली, कारला ओव्हरटेक केलं आणि मुद्दाम वारंवार ब्रेक मारून घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण हा सगळा प्रकार कारच्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड होत होता.

'जेमिनीच आता माझा वकील'

सुरुवातीला सिद्धार्थ यांनी हा विषय सोडून देण्याचा विचार केला होता. पण कारच्या दरवाजाला पडलेला मोठा डेंट पाहून त्यांनी पोलिसांत जाण्याचं ठरवलं. कोरमंगला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी त्यांनी जेमिनी AI ची मदत घेतली.

तक्रार दिल्यानंतर त्याची लेखी पोचपावती घेण्याचा सल्लाही जेमिनीने दिला होता. याच कारणामुळे सिद्धार्थ यांनी गमतीत "Gemini is my lawyer now!" अशी पोस्ट केली.

डॅशकॅम ठरला महत्त्वाचा पुरावा

पोलिसांनी डॅशकॅम फुटेज आणि इतर पुरावे तपासले. या फुटेजमधील बाईकच्या नंबरवरून पोलिसांनी त्या बाईकस्वाराला शोधून काढलं.

पोलिसांनी बाईकस्वाराला पोलीस ठाण्यात बोलावलं. सुरुवातीला त्याने स्वतःचीच बाजू खरी असल्याचा दावा केला. पण जेव्हा त्याला डॅशकॅम फुटेज दाखवण्यात आलं, तेव्हा त्याची बोलतीच बंद झाली.

अखेर माफी आणि नुकसान भरपाई

या प्रकरणाच्या शेवटी बाईकस्वाराने लेखी माफी मागितली आणि कारच्या दुरुस्तीसाठी पैसेही दिले. पोलिसांनी कोणतीही लाच न घेता खूप सहकार्य केल्याचं सिद्धार्थ यांनी आपल्या पोस्टमध्ये आवर्जून सांगितलं. या घटनेनंतर सोशल मीडियावर डॅशकॅम आणि AI च्या वापराबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.