Belgaum Crime News : बेळगाव शहरातील जोशीमाळ भागात एका कुटुंबातील तिघांचा विष प्राशन करून मृत्यू झाला असून, एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

बेळगाव : बेळगाव शहरातील जोशीमाळ भागात आज सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संतोष कुराडेकर (44), सुवर्णा कुराडेकर आणि मंगला कुराडेकर या तिघांचा विष प्राशन केल्याने मृत्यू झाला आहे. तर, सुनंदा कुराडेकर यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या कुटुंबाने विष प्राशन केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला आहे. शहापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

या कुटुंबाने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून कोणतीही चिठ्ठी किंवा सुसाइड नोट न मिळाल्याने, या सामूहिक आत्महत्येमागील नेमके कारण काय आहे, हे गुलदस्त्यात आहे. सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या सुनंदा कुराडेकर यांच्याकडून काही माहिती मिळण्याची शक्यता आहे, परंतु त्या शुद्धीवर येण्याची पोलीस प्रतीक्षा करत आहेत. तोपर्यंत पोलीस आपला तपास सुरू ठेवतील.

पंढरपूरमधील हृदयद्रावक घटनेची आठवण

या घटनेमुळे काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे घडलेल्या एका घटनेची आठवण ताजी झाली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी कौटुंबिक वादातून मोनाली (25), तिचा सहा वर्षांचा मुलगा कार्तिक आणि चार वर्षांची मुलगी प्रगती यांनी आपल्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. मोनालीने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी घेतल्याचे समजताच, तिचा पती म्हमाजी याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेने पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. बेळगावातील या घटनेने पुन्हा एकदा कौटुंबिक समस्या आणि मानसिक आरोग्याच्या मुद्द्यांवर गंभीर चिंतन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.