Amravati Police Officer Murder : अमरावतीत एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) ची चारचाकीने उडवून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. पोलिसांनी काही तासांत दोन आरोपींना अटक केली असून, पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.

अमरावती : संपूर्ण शहर हादरवून टाकणारी एक खळबळजनक घटना अमरावतीत घडली आहे. वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम अब्दुल कादर यांची चारचाकीने उडवून, त्यानंतर धारदार शस्त्राने छातीवर-पोटावर सपासप वार करत हत्या करण्यात आली. भरदिवसा शहरात घडलेल्या या नृशंस हत्येमुळे पोलीस यंत्रणेसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हत्या की पूर्वनियोजित घातपात?

अब्दुल कलाम अब्दुल कादर हे नेहमीप्रमाणे दुचाकीने आपल्या कर्तव्यावर निघाले होते, तेव्हा अचानक मागून आलेल्या चारचाकी गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. रस्त्यावर पडताच दोन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्या छाती आणि पोटावर सपासप वार केले आणि घटनास्थळावरून फरार झाले.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही हत्या इतकी थरारक होती की काही क्षणांतच परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

पोलीस आयुक्त घटनास्थळी, आरोपींचा काही तासांत छडा

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेगाने पथके तयार केली आणि केवळ काही तासांत दोन आरोपींना अटक केली. प्राथमिक तपासानुसार, या प्रकरणात एकूण सहा जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास गाडगेनगर पोलीस ठाण्यात सुरू आहे.

पैशाच्या वादातून हत्या, मध्यस्थीच झाली जीवावर

२० जून रोजी अब्दुल कलाम अब्दुल कादर यांचे बंधू यांचा काही लोकांशी आर्थिक वाद झाला होता. त्यावेळी एएसआय अब्दुल कलाम अब्दुल कादर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. हाच राग मनात ठेवून आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

पोलिसांचाही जीव सुरक्षित नाही, मग सामान्यांचा काय?

एका एएसआय दर्जाच्या अधिकाऱ्याची भरदिवसा अशी निर्घृण हत्या झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुन्हेगार आता पोलीस अधिकाऱ्यांनाही न बघता हल्ला करत आहेत, मग सामान्य जनतेचं काय? पोलिसांचा धाक उरला आहे का? असा गंभीर सवाल अमरावतीकर विचारत आहेत.

खरे मास्टरमाइंड कोणी?, हल्ल्याचे नेमके कारण काय?

पोलिसांनी या प्रकरणात तातडीने अटक केली असली, तरी खरे मास्टरमाइंड कोणी? हल्ल्याचे नेमके कारण काय? हे उलगडणे आता तपासासाठी मोठं आव्हान ठरणार आहे. गुन्हेगार किती बिनधास्त झाले आहेत, याचे हे उदाहरण ठरू शकते.

अमरावतीत घडलेली ही घटना कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. पोलिसांवर हल्ला होतो आहे, म्हणजे गुन्हेगारांचा आत्मविश्वास अधिकच बळावला आहे. आता यावर शासन आणि पोलीस प्रशासन कोणती कठोर पावले उचलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.