बीड शहरात लग्नाच्या खरेदीसाठी जात असलेल्या महिलेचा कंटेनरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. अण्णाभाऊ साठे चौकात घडलेल्या या भीषण अपघातात एक चिमुकली जखमी झाली असून, संतप्त नागरिकांनी चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

बीडमध्ये एक हृदयद्रावक अपघात घडला असून लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या महिलेचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बीड शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात घडली. संबंधित महिला कुटुंबासह बाजारपेठेकडे दुचाकीवरून जात असताना भरधाव कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी थेट कंटेनरच्या चाकाखाली गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

जीव वाचवताचं आला नाही 

मृत महिलेचे नाव प्रतिभा चौधरी असे असून त्या लग्नाच्या खरेदीसाठी सुभाष रोडकडे जात होत्या. अपघात इतका भीषण होता की त्यांना जीव वाचवता आला नाही. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात दुचाकीवरील एका चिमुकलीचा जीव थोडक्यात बचावला, मात्र ती जखमी झाली आहे. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

चालकाला पकडून पोलिसांच्या दिलं ताब्यात

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कंटेनर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. प्राथमिक माहितीनुसार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून या अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.