दिल्ली विद्यापीठातील एका विद्यार्थिनीचा मृतदेह सिग्नेचर ब्रिजजवळील नदीत सापडला. तिने सुसाईड नोटमध्ये ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा निर्णय लिहिला होता

दिल्ली विद्यापीठातील एक विद्यार्थिनीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. आत्मा राम सनातन धर्म कॉलेजची विद्यार्थिनी आणि त्रिपुराची रहिवासी असलेली स्नेहा देबनाथ ७ जुलैपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह दिल्लीतील गीता कॉलनी येथील उड्डाणपुलाजवळील नदीत तरंगताना दिसून आला, स्नेहाने आत्महत्येचा निर्णय घेतला होता.

सुसाईड नोटमध्ये काय म्हटलं होतं? 

ती सिग्नेचर ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करणार असल्याचे तिने सुसाइड नोटमध्ये लिहिले होते. स्नेहा देबनाथ ही ७ जुलैपासून गायब झाली होती. पोलीस तिचा मग काढण्याचा प्रयत्न करत होते पण तिचा थांगपत्ताच लागत नव्हता. तिने सकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी आपल्या आईला फोन करून सांगितले की, ती आपल्या मैत्रिणीला सराय रोहिल्ला रेल्वे स्टेशनवर सोडायला जात आहे. आईने नंतर तिला फोन केला, तेव्हा तिचा फोन बंद येत होता.

कुटुंबीयांनी पोलिसात केली तक्रार दाखल 

कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा कॅब चालकाने सांगितले की, त्याने तिला सिग्नेचर ब्रिजजवळ सोडले होते. स्नेहाच्या खोलीमध्ये पोलिसांना एक पत्र सापडले आहे. त्यात तिने लिहिलं आहे की, "मी माझे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी सिग्नेचर ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करेन. मी स्वतःला एक कमनशीबी आणि ओझे समजते आणि अशा प्रकारे जगणे आता माझ्यासाठी असह्य झाले आहे. यात कोणतेही षड्यंत्र किंवा जबरदस्ती नाही आणि हा माझा स्वतःचा निर्णय आहे." असं तिने पत्रामध्ये लिहिलं आहे.

स्नेहा बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तिला सोडलेल्या कॅब चालकाचा माग काढला. त्याचा मग काढल्यानंतर त्याने यमुना नदीवरील सिग्नेचर ब्रिजजवळ तिला सोडल्याचा सांगितलं. या ठिकाणी एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे स्नेहाचा शोध घेणं पोलिसांना अवघड जात होते. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची माहिती समजताच या आजूबाजूला तपासाला सुरुवात केली होती.

आत्महत्येच्या निर्णयापासून परावृत्त करा 

कोणतीही व्यक्ती आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत असल्याचं जाणवल्यास, तिला एकटं न सोडता तिला समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. तिच्या भावना ऐकणं, तिला आधार देणं आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी प्रेरित करणं अत्यंत गरजेचं आहे. अशा वेळी कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आत्महत्येचे विचार हे तात्पुरते असतात, पण त्या व्यक्तीला वेळीच मदत मिळाली तर तिचं आयुष्य वाचू शकतं. त्यामुळे अशा परिस्थितीत संवेदनशीलपणे, पण तात्काळ कृती करणं आवश्यक आहे.