Navratri 2024 : महाराष्ट्रातील देवींची साडेतीन शक्तीपीठे, वाचा अख्यायिका

Published : Sep 21, 2024, 10:57 AM ISTUpdated : Sep 27, 2024, 01:21 PM IST
Renukmata Temple

सार

Navratri 2024 : येत्या 3 ऑक्टोंबरपासून देशभरात नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. अशातच महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमध्येही नवरात्रौत्सावेळी देवीच्या दर्शनाला फार मोठी गर्दी होते. याच शक्तीपीठांबद्दल जाणून घेऊया…

Maharashtra Sadetin Shakti Peeth History : आदिमायाशक्तीचे मानवी रूप असलेल्या देवीची आराधना पूर्वापार होत आली आहे. संपूर्ण भारतामध्ये देवीचे विविध शक्तिस्थळ आहेत. महाराष्ट्रात आदिमायाशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता आणि वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी माता यांना साडेतीन शक्तिपीठे म्हणून संबोधले जाते. या शक्तीपिठांचे महत्त्व देखील मोठे आहे. ही साडे तीन शक्तिपीठे खूपच जागृत देवस्थाने मानली जातात. येथे जाऊन देवीचे भक्त मोठ्या भक्तिभावाने देवीची सेवा करतात आणि आपल्या मनातील भावना देवीसमोर मांडतात. या तीर्थक्षेत्रांवर दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.

महालक्ष्मी माता मंदिर, कोल्हापूर


कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. 600 ते 700 मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे पूर्ण शक्तीपीठांपैकी एक आहे. मंदिराची मुख्य रचना दोन मजली असून हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडापासून बनवण्यात आलेले आहे. या मंदिरामध्ये घाती दरवाजा, गरुड मंडप इत्यादी कोरीव केलेल्या रचना आहेत. या मंदिरातील गरुड मंडप आणि सभा मंडप हे 1844 ते 1867 च्या दरम्यान बनवले गेले आहे.

तुळजाभवानी माता, श्री क्षेत्र तुळजापूर


साडेतीन शक्तिपीठापैकी श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. देवीचे मंदिर बालाघाटावरील एक डोंगरमाथ्यावर आहे. मंदिराच्या काही भागांची बांधणी हेमाडपंती आहे. स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज, भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे.

रेणुकादेवी माता, माहूर


देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी माहूरची देवी रेणुकामाता ही एक आहे. तिला श्री परशुरामची आई म्हणून ओळखले जाते. ती महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची संरक्षक देवी आहे. हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधले होते, असे मानले जाते. माहूर येथील किल्ल्यात देवीच्या मंदिरासह इतर देवांचे देखील मंदिर आहे. जसे, परशुराम मंदिर, दत्तात्रय मंदिर, अनासू मंदिर, कालिकामाता मंदिर इ. श्री दत्तात्रयांचा जन्म माहुर गडावर झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

सप्तशृंगीदेवी, वणी (नाशिक)


साडेतीन शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या शक्ती पीठाचा मान सप्तश्रुंगीला मिळाला आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन्‌ होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते. येथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचेही हे एकच रूप आहे, असे मानले जाते. उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये येथे सात उंच शिखरे आहेत, त्यावरूनच या ठिकाणाचे नाव सप्तशृंगी गढ पडले आहे. सप्तशृंगीदेवी नाशिकपासून 65 किलोमीटरवरील 4800 फूट उंचीवरील सप्तशृंगगडावर वसलेली आहे.

आणखी वाचा : 

Navratri 2024 : शारदीय नवरात्रीत केली जाते या 9 देवींची पूजा, वाचा पूजेचे महत्व

यंदाच्या Navratri 2024 मधील 9 रंग, देवी दुर्गा होईल प्रसन्न

PREV

Recommended Stories

अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनची चर्चा! २०२५ मध्ये टॉपवर असलेले नीता-ईशाचे १० सर्वाधिक महागडे आणि स्टायलिश दागिने पाहा!
फक्त ₹700 मध्ये! 'या' 1 ग्राम गोल्ड चेन डिझाईन्स पुढे खरं सोनंही फिकं पडेल!