इस्तंबूलहून वॉशिंग्टनला जाणाऱ्या १० तासांच्या फ्लाईटमध्ये एका महिलेला नवऱ्याशेजारी बसायचं होतं. पण अमेरिकन ट्रॅव्हल ब्लॉगर टोमिको हार्वे हिने आपली सीट द्यायला नकार दिला. यानंतर ती महिला चक्क ३ तास रडत बसली. सध्या सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

लांब पल्ल्याच्या विमान प्रवासात एका महिलेला आपल्या नवऱ्याशेजारी बसायचं होतं. त्यासाठी तिने शेजारच्या प्रवाशाला सीट बदलून देण्याची विनंती केली. पण अमेरिकन ट्रॅव्हल ब्लॉगर टोमिको हार्वे (Tomiko Harvey) हिने आपली सीट द्यायला स्पष्ट नकार दिला. या नकारावर ती महिला चक्क तीन तास रडत बसली होती. इस्तंबूलहून वॉशिंग्टन डीसीला जाणाऱ्या १० तासांच्या फ्लाईटमधला हा किस्सा टोमिकोने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगली आहे.

नवऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसायचं होतं

टोमिको हार्वे तिच्या वडिलांच्या निधनानंतर कझाकस्तानहून परतत होती. प्रवासादरम्यान एका महिलेने तिला नवऱ्यासोबत बसण्यासाठी सीट बदलून देण्याची विनंती केली. पण टोमिकोने नकार दिला. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत सांगितलंय की, ती महिला त्यानंतर खूप वेळ रडत होती. ती सतत रडत असल्याचं पाहून टोमिकोने तिला विचारलं, "कोणी वारलंय का?" त्यावर ती महिला म्हणाली, "नाही, मला माझ्या नवऱ्याची आठवण येतेय आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मला आराम करायचा आहे."

View post on Instagram
 

एकत्र बसायचं असेल तर जास्तीचे पैसे मोजा

टोमिकोने पुढे सांगितलं की, त्या महिलेचा नवरा दोन रांगा पुढे मधल्या सीटवर बसला होता. तो संपूर्ण प्रवासात हेडफोन लावून मस्त झोपला होता. लांब पल्ल्याच्या प्रवासात अनोळखी व्यक्तीला सीट बदलायला सांगणं कितपत योग्य आहे, असा सवालही टोमिकोने उपस्थित केलाय. ज्यांना एकत्र प्रवास करायचा आहे, त्यांनी आधीच तशी सीट बुक करावी किंवा जास्तीचे पैसे देऊन सीट निवडावी, असं तिचं स्पष्ट मत आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये विमान लँड झाल्यावर टोमिकोने त्या महिलेला नवऱ्याशिवाय १० तासांचा प्रवास पूर्ण केल्याबद्दल टोमणा मारत शुभेच्छाही दिल्या.

नेटकऱ्यांमध्ये दोन गट

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काहींनी टोमिकोच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय. "आपण स्वतःच्या आवडीची सीट पैसे देऊन बुक करतो, त्यामुळे ती दुसऱ्याला देण्याची काहीच गरज नाही," असं अनेकांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे, फ्लाईटमधले शिष्टाचार आणि सहप्रवाशांबद्दल थोडी माणुसकी दाखवण्यावरूनही नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.