जपानमध्ये 'जिको बुक्केन' नावाने ओळखली जाणारी 'भुताटकी' असलेली घरं सध्या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. आत्महत्या किंवा एकटेपणाने मृत्यू झालेल्या लोकांच्या या घरांना खूप कमी किमतीत विकलं जात आहे, ज्यामुळे स्वस्त घरांचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
मुंबई : जपानमध्ये सध्या महागाई आणि घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे घर खरेदी करणारे आणि भाडेकरू अशा घरांचा विचार करत आहेत, ज्यांच्याकडे सहसा लोक फिरकतही नाहीत. आत्महत्या, खून, आग किंवा अनेक दिवस कुणालाही न समजलेले मृत्यू... अशा घटना घडलेली ही घरं खूपच स्वस्तात मिळतात. जपानमध्ये या घरांना 'जिको बुक्केन' (jiko bukken) किंवा कलंकित घरं म्हटलं जातं. या घरांचा इतिहासच असा असतो की, ती इतर घरांपेक्षा कितीही स्वस्त असली तरी ती विकणं किंवा भाड्याने देणं खूप कठीण जातं.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, घरांच्या वाढत्या किमतींमुळे लोक आता या घरांचा एक स्वस्त पर्याय म्हणून विचार करत आहेत. या घरांना समाजात चांगलं मानलं जात नसलं तरी लोक आता त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. काही लोकांना या घरांच्या भूतकाळाची भीती वाटते, पण काही जण कमी किमतीमुळे या गोष्टींकडे कानाडोळा करायला तयार आहेत.
'जिको बुक्केन' म्हणजे नेमकं काय?
'जिको बुक्केन' हा एक जपानी शब्द आहे. ज्या घरांमध्ये काही भयंकर घटना घडल्या आहेत आणि त्यामुळे लोक ती घरं घेण्यास टाळाटाळ करतात, अशा घरांसाठी हा शब्द वापरला जातो. यामध्ये अशी घरं येतात जिथे कुणीतरी आत्महत्या केलीय, कुणाचा खून झालाय, एखादा मोठा अपघात किंवा आग लागलीय, किंवा जिथे कुणीतरी एकटंच मरण पावलंय आणि त्यांचा मृतदेह खूप दिवसांनी सापडलाय.
अशा घरांना अनेकदा 'कलंकित घरं' म्हटलं जातं. कारण त्यांच्या या इतिहासामुळे त्यांची बाजारातली किंमत पडते आणि ती विकणं किंवा भाड्याने देणं अवघड होतं. म्हणूनच, घरमालक आणि विक्रेते ही घरं आजूबाजूच्या इतर घरांपेक्षा खूपच कमी किमतीत विकायला काढतात.
जपान सरकारने २०२१ मध्ये काही नियम लागू केले आहेत. यानुसार, जर एखाद्या घरात कुणाचा मृत्यू झाला असेल, तर इस्टेट एजंट्सना ती माहिती घर घेणाऱ्यांना किंवा भाडेकरूंना सांगणं बंधनकारक आहे.
बीबीसीच्या माहितीनुसार, भाड्याने देण्याच्या घरांसाठी ही माहिती किमान तीन वर्षांपर्यंत सांगणं गरजेचं असतं. पण जर घर विकलं जात असेल, तर मात्र हा इतिहास कायमस्वरूपी सांगावाच लागतो.
टोकियोमध्ये आत्महत्येचा इतिहास असलेल्या घरासाठी कमी भाडं
बीबीसीच्या रिपोर्टमध्ये रयुआ (Ryua) नावाच्या एका तरुणीची गोष्ट सांगितली आहे. ती एक एंटरटेनर आहे आणि टोकियोच्या सेतागाया वॉर्डमध्ये २५ चौरस मीटरच्या एका छोट्या घरात भाड्याने राहते. तिने सांगितलं की, जेव्हा ती पहिल्यांदा हे घर पाहायला गेली, तेव्हाच तिला तिथे भुताटकी असल्याचा भास झाला होता.
"जेव्हा मी हे घर पाहायला आले, तेव्हा तिथे एक माणूस उभा होता आणि तो माझ्याकडे एकटक पाहत होता," असं तिने सांगितलं.
"माझ्यासोबत असलेल्या इस्टेट एजंटला तो माणूस दिसत नव्हता, तेव्हा मला समजलं की ते नक्कीच भूत असणार," असंही ती म्हणाली.
रयुआला नंतर सांगण्यात आलं की, त्या घरात एका माणसाने आत्महत्या केली होती. या घराच्या अशा इतिहासामुळेच त्याचं भाडं खूप कमी करण्यात आलं होतं.
बीबीसीनुसार, ती या घरासाठी महिन्याला ४५,००० येन भाडं देते. या घराचं नेहमीचं भाडं साधारण ६२,००० येन असतं. म्हणजे तिला हे घर जवळपास ३० टक्के स्वस्तात मिळालं आहे.
घराचा भूतकाळ काहीही असला तरी, टोकियोसारख्या महागड्या शहरात कमी भाड्यामुळे तिला हे घर परवडणारं वाटलं. पण, रयुआ सांगते की तिला आजही त्या घरात काही विचित्र आणि अमानवीय गोष्टींचा अनुभव येतो.
तिथे चार वर्ष राहिल्यानंतरही तिला अजूनही पावलांचा आवाज येतो आणि कुणीतरी भूत बोलत असल्याचा भास होतो. हे अनुभव तिला रोजच येतात, असं तिने सांगितलं.
अमेरिकन महिलेने कागोशिमामध्ये घेतलं स्वस्त घर
बीबीसीने डायन टिंचर (Diane Tincher) या ६९ वर्षीय अमेरिकन महिलेचीही माहिती दिली आहे. त्यांनी नैऋत्य जपानमधील कागोशिमामध्ये तीन बेडरूमचं एक घर विकत घेतलं आहे. टिंचर गेल्या ४० वर्षांपासून जपानमध्ये राहतात आणि टूर गाईड म्हणून काम करतात. त्यांनी या घरासाठी २ कोटी येन (20 million yen) मोजले आहेत.
रिपोर्टनुसार, या भागातल्या अशाच घरांची किंमत साधारण साडेचार कोटी येन (45 million yen) पर्यंत असते. याचाच अर्थ, टिंचर यांना हे घर निम्म्याहून कमी किमतीत मिळालं आहे.
इस्टेट एजंटने त्यांना सांगितलं होतं की, या घरात एका वृद्ध महिलेचा एकटेपणात मृत्यू झाला होता. याच कारणामुळे घराची किंमत पडली होती. टिंचर यांनी सांगितलं की, त्यांना हे घर 'ओशिमालँड' (Oshimaland) नावाच्या वेबसाईटवर सापडलं. ही वेबसाईट मृत्यू आणि इतर घटनांशी संबंधित घरांची यादी आणि त्यांचा इतिहास देते.
"माझा भुतांवर विश्वास नाही. पण मला माहितीये की जपानी लोक खूप अंधश्रद्धाळू असतात. जर तिथे खरंच एखादं भूत असेल, तर मी रोज तिचे आभार मानते... कारण तिच्यामुळेच मला इतकं सुंदर आणि परवडणारं घर मिळालं," असं टिंचर म्हणाल्या.
जपानमध्ये अशी 'कलंकित घरं' विकणं कठीण का जातं?
टोकियोमधले इस्टेट एजंट एरिक ओस्कॅम्प यांनी बीबीसीला सांगितलं की, जपानी लोक मृत्यू किंवा इतर भयानक घटना घडलेल्या घरांमध्ये राहायला खूप घाबरतात.
"स्मशानभूमीच्या शेजारी असलेलं घर भाड्याने देणंही खूप कठीण जातं, विशेषतः जर किचनमधून थडगी दिसत असतील," असं ओस्कॅम्प यांनी स्पष्ट केलं.
"सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे जर घरात कुणी आत्महत्या केली असेल. अगदी कुणी छतावरून उडी मारून जीव दिला असेल, तरी अनेक भाडेकरू घर सोडून जातात. याशिवाय गंभीर गुन्हे किंवा एकटेपणात झालेले मृत्यू यांमुळेही लोक अशी घरं घेत नाहीत," असंही ते म्हणाले.
लोकांच्या या भीतीमुळे अशा घरांची मागणी कमी होते. त्यामुळे घरमालकांना भाडेकरू किंवा ग्राहक मिळवण्यासाठी घराचं भाडं किंवा किंमत कमी करावी लागते. स्मशानभूमीजवळ असलेली किंवा भयानक घटना घडलेल्या ठिकाणांजवळची घरंही याच कारणामुळे बदनाम होतात.
'ओशिमालँड'वर मिळते मृत्यू आणि इतर घटनांशी संबंधित घरांची माहिती
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, २००५ मध्ये सुरू झालेल्या 'ओशिमालँड' या वेबसाईटने सुरुवातीला फक्त टोकियोमधल्या घरांची माहिती देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी संपूर्ण जपान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपलं काम वाढवलं.
ही वेबसाईट लोकांच्या मदतीने चालते. सामान्य लोक मृत्यू आणि इतर घटनांशी संबंधित घरांची माहिती या वेबसाईटवर देऊ शकतात. या वेबसाईटचे संस्थापक तेरू ओशिमा यांनी बीबीसीला सांगितलं की, एकेकाळी अशी घरं घेणं लोक पूर्णपणे टाळायचे.
पण आता वाढत्या किमती आणि महागाईमुळे लोकांचा या घरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. बीबीसीने दिलेल्या २०२५ च्या एका सर्वेक्षणानुसार, जपानमधल्या निम्म्याहून अधिक लोकांनी सांगितलं की, जर भाडं खूपच कमी असेल, तर ते 'जिको बुक्केन' घरात राहायला तयार आहेत.
या घरांना समाजात अजूनही कलंकित मानलं जात असलं तरी, त्यांच्या कमी किमतीमुळे स्वस्त घरं शोधणारे लोक तिकडे आकर्षित होत आहेत. काहींसाठी घराच्या भूतकाळापेक्षा पैसे वाचवणं जास्त महत्त्वाचं ठरत आहे.






