US Spends Billions on Iran Conflict : इराणविरुद्धची लष्करी कारवाई अमेरिकेसाठी खूपच महागडी ठरत आहे. CSIS च्या रिपोर्टनुसार, युद्धाच्या पहिल्या १०० तासांत अमेरिकेने जवळपास ३.७ अब्ज डॉलर्स खर्च केले. रोजचा खर्च सुमारे ८९१ दशलक्ष डॉलर्स असून पेंटागनला अतिरिक्त बजेटची गरज भासू शकते.
US Spends Billions on Iran Conflict : २८ फेब्रुवारीपासून इराणसोबत सुरू झालेलं अमेरिकेचं युद्ध आता त्यांना चांगलंच महागात पडत आहे. अमेरिकेला केवळ लष्करी उपकरणांचंच नुकसान सोसावं लागलं नाही, तर युद्धाच्या ऑपरेशनवरही प्रचंड खर्च करावा लागत आहे. सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज (CSIS) च्या एका नव्या रिपोर्टनुसार, इराणविरुद्धच्या कारवाईच्या पहिल्या १०० तासांत, म्हणजेच फक्त ४ दिवसांत अमेरिकेने तब्बल ३.७ अब्ज डॉलर्स (सुमारे ३.४ लाख कोटी रुपये) खर्च केले आहेत. रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की, हा खर्च आधीपासून ठरलेल्या संरक्षण बजेटमध्ये नव्हता.
इराणसोबतच्या लढाईत अमेरिका दररोज किती खर्च करत आहे?
CSIS चे संशोधक मार्क कॅन्सियन आणि ख्रिस पार्क यांच्या विश्लेषणानुसार, इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेला दररोज सुमारे ८९१.४ दशलक्ष डॉलर्स (जवळपास ८,१९३.७४ कोटी रुपये) खर्च येत आहे. यातला सर्वात मोठा खर्च अत्याधुनिक शस्त्रं आणि स्टेल्थ बॉम्बर्ससारख्या प्रगत लष्करी सिस्टीमवर झाला आहे. या बॉम्बर्सच्या मदतीने अमेरिकेने इराणच्या अनेक ठिकाणांवर मोठे हल्ले केले. यात इराणच्या जमिनीखालील मिसाइल सुविधांचं नुकसान झाल्याचा दावा केला जातोय. पण, इराणचे हल्ले रोखण्यासाठी मिसाइल डिफेन्स सिस्टीम आणि इतर लष्करी उपायांवरही अमेरिकेला मोठी रक्कम खर्च करावी लागली आहे.
२,००० पेक्षा जास्त मोठ्या शस्त्रास्त्रांचा वापर
रिपोर्टनुसार, युद्धाच्या पहिल्या १०० तासांमध्ये अमेरिकन सैन्याने २,००० पेक्षा जास्त मोठ्या शस्त्रास्त्रांचा वापर केला. ही शस्त्रं पुन्हा भरून काढण्यासाठी (रिप्लेसमेंट) जवळपास ३.१ अब्ज डॉलर्स खर्च होण्याचा अंदाज आहे. जर ही शस्त्रं लगेच बदलली नाहीत, तर दररोज सुमारे ७५८.१ दशलक्ष डॉलर्सचा (जवळपास ६,९६८ कोटी रुपये) अतिरिक्त आर्थिक बोजा वाढू शकतो. संशोधकांनी सांगितलं की, हे कॅल्क्युलेशन अमेरिकन लष्करी तुकड्यांच्या ऑपरेशन आणि सपोर्ट खर्चासाठी काँग्रेसच्या बजेट ऑफिसच्या (CBO) अंदाजांवर आधारित आहे. याशिवाय, युद्धादरम्यान वाढलेल्या हालचालींमुळे (हाय ऑपरेशनल टेम्पो) अंदाजे १०% अतिरिक्त खर्चही जोडण्यात आला आहे.
पेंटागनला अतिरिक्त बजेटची गरज भासू शकते
रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, सुरुवातीच्या ३.७ अब्ज डॉलर्सच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३.५ अब्ज डॉलर्स बजेटमध्ये आधीपासून ठरलेले नव्हते. याचा अर्थ असा की, अमेरिकेच्या संरक्षण विभागाला, म्हणजेच पेंटागनला, लवकरच काँग्रेसकडे अतिरिक्त निधीची मागणी करावी लागू शकते. विश्लेषकांच्या मते, अशा वेळी अतिरिक्त बजेट पास करणं सोपं नसेल, कारण अमेरिकेतील अनेक विरोधी नेते या युद्धाला विरोध करत आहेत. यामुळे ट्रम्प प्रशासनासमोर आर्थिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर आव्हानं वाढू शकतात.
इराण युद्धामुळे अमेरिकेवर मोठा आर्थिक बोजा
CSIS च्या रिपोर्टनुसार, इराणसोबतच्या संघर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अमेरिकन सैन्याने मोठ्या प्रमाणावर लष्करी साधनसामग्री वापरली. युद्धादरम्यान सततची ऑपरेशन्स, शस्त्रास्त्रांचा वापर आणि सुरक्षा उपायांमुळे अमेरिकेचा खर्च झपाट्याने वाढला आहे. रिपोर्टमधून हे स्पष्ट होतंय की, केवळ पहिल्या १०० तासांतच अमेरिकेला अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागले, ज्यामुळे ही लष्करी मोहीम आर्थिकदृष्ट्याही खूपच जड जात असल्याचं दिसतंय.


