US Prepares Secret Ground Operation : इराणवर हल्ला करून तिथलं जवळपास ४०० किलो युरेनियम जप्त करण्याची एक गुप्त योजना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आखल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

US Prepares Secret Ground Operation : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी 'येत्या २-३ आठवड्यांत इराणवर मोठा हल्ला करून युद्ध थांबवू' असं विधान केलं होतं. या विधानामागचा खरा हेतू आता समोर आला आहे. ट्रम्प यांनी इराणकडे असलेलं युरेनियम जप्त करण्याचा एक मोठा 'मास्टर प्लॅन' तयार केला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

अमेरिकेच्या 'वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्राने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखण्यासाठी ट्रम्प कोणत्याही थराला जायला तयार आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी अमेरिकेच्या हजारो सैनिकांना इराणमध्ये घुसून तिथला जवळपास ४०० किलो युरेनियमचा साठा जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

इराणने युरेनियम कुठे लपवून ठेवलं आहे? जमिनीवरून हल्ला कसा करायचा? इराणने प्रत्युत्तर दिल्यास त्याला कसं तोंड द्यायचं? आणि युरेनियम जप्त करताना काही अपघात झाल्यास पर्यायी योजना काय असेल, या सगळ्याचा एक सविस्तर रिपोर्ट अमेरिकेच्या लष्कराने तयार केला आहे. या रिपोर्टला ट्रम्प यांनी हिरवा कंदील दाखवला असल्याचंही सूत्रांनी म्हटलं आहे.

जर अमेरिकेने खरंच अशी कारवाई केली, तर ही जगाच्या इतिहासातील सर्वात थरारक, धाडसी आणि तितकीच धोकादायक लष्करी कारवाई ठरू शकते.

किरणोत्सर्गाचा (Radiation) मोठा धोका

समजा, अमेरिकेला युरेनियम जप्त करण्यात यश आलं नाही आणि त्यांनी तो साठा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी मोठा धोका आहे. कारण हे युरेनियम वायूच्या (gas) स्वरूपात मोठ्या टाक्यांमध्ये साठवलेलं आहे. ते नष्ट करताना हवेत पसरल्यास मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग (radiation) होऊ शकतो. याचा परिणाम आजूबाजूच्या शेकडो किलोमीटर परिसरात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर गंभीर आणि दीर्घकाळ होऊ शकतो. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑपरेशनमधील आव्हानं

हवाई हल्ल्यातील धोका टाळण्यासाठी अमेरिकेने जमिनीवरून हल्ला करण्याचा निर्णय घेतला, तरी ते सोपं नाही. कारण इराणने आपलं युरेनियम इस्फहान, नतान्झ आणि फोर्डो या तीन ठिकाणी ठेवलं आहे. यापैकी फक्त इस्फहानमध्ये कारवाई करण्यासाठी कमीत कमी १,००० सैनिक लागतील. शिवाय, जमिनीखालील बोगद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष उपकरणंही सोबत न्यावी लागतील. आणि जरी युरेनियमचा साठा सापडला, तरी तो सुरक्षितपणे अमेरिकेपर्यंत घेऊन जाणं हे एक खूप मोठं आव्हान असेल.

युरेनियम जप्त करण्याचा उद्देश काय?

इराण नेहमीच म्हणत आलंय की त्यांचा अणुकार्यक्रम शांततेसाठी आहे, अणुबॉम्ब बनवण्यासाठी नाही. पण आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) रिपोर्टनुसार, इराणकडे सध्या ४४०.९ किलो युरेनियम आहे, जे ६०% पर्यंत शुद्ध (enriched) केलेलं आहे. अणुबॉम्ब बनवण्यासाठी युरेनियम ९०% शुद्ध असावं लागतं. इराणने जर हे युरेनियम ९०% पर्यंत शुद्ध केलं, तर त्यातून तब्बल १० अणुबॉम्ब बनवले जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मध्य-पूर्वेतील सर्वात उंच पुलावर हल्ला

एकीकडे या गुप्त ऑपरेशनची चर्चा सुरू असतानाच, अमेरिका आणि इस्रायलने मिळून मध्य-पूर्वेतील सर्वात उंच पुलावर, म्हणजेच खराज येथील बी१ (B1) पुलावर भीषण हल्ला केला आहे. १३६ मीटर उंच असलेल्या या पुलाजवळ झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले, "इराणचा सर्वात मोठा पूल कोसळला, तो आता पुन्हा कधीच वापरता येणार नाही. असे अनेक हल्ले पुढेही होतील." यासोबतच त्यांनी इराणला इशारा दिला की, "खूप उशीर होण्याआधी इराणने आमच्याशी करार करण्याची हीच योग्य वेळ आहे."