Ukraine Odesa Port MV Golden Ship Missile Attack : समुद्रातून धान्य घेऊन जाणाऱ्या जहाजावर मिसाईल हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चार भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक भारतीय गंभीर जखमी आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : युक्रेनजवळ समुद्रात मिसाईल हल्ला झाल्याची माहिती मिळते आहे. समुद्रात जहाजावर झालेल्या या हल्ल्यात चार भारतीयांचा मृत्यू झाला आहे. तर एक भारतीय गंभीर जखमी आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. युक्रेनच्या ओडेसा या बंदरातून जात असताना जहाजावर हल्ला झाला. एमव्ही गोल्डन लिओ असं मिसाईल हल्ला झालेल्या या जहाजाचं नाव आहे. हा हल्ला रशियन क्षेपणास्त्रांनी केला असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने माहिती देताना सांगितलं, की १९ जुलै रोजी एमव्ही गोल्डन लिओ हे जहाज युक्रेन येथील ओडेसा या बंदरातून जात होतं. त्यावेळी जहाजावर हल्ला झाला. जहाजावर हल्ला झाला त्यावेळी तिथे एकूण १७ कर्मचारी होते. त्यापैकी पाच कर्मचारी भारतीय होते. त्या पाच भारतीयांपैकी चार भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक भारतीय कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे जहाज पश्चिम आफ्रिकेतील गिनी-बिसाऊ या देशाचा झेंडा लावून प्रवास करत होतं, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाकडून भारत अशा हल्ल्यांचा निषेध करत असल्याचं म्हटलं आहे. तसंच व्यापारी जहाजांना लक्ष्य करत त्यावर हल्ला करणं, जहाजांची ये-जा आणि व्यापारात अडथळा आणणं, निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात घालणं या गोष्टींचा निषेध करत असल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे.
धान्यांची वाहतूक सुरू असताना समुद्रातील जहाजावर हल्ला
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ओडेसा येथून मका, धान्य घेऊन निघालेल्या गोल्डन लिओ या मालवाहू जहाजावर रशियन मिसाईलने हल्ला केला. या हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली आणि धूर निघू लागला. घटनेनंतर रात्रभर शोध आणि बचावकार्य सुरू होतं. या जहाजामधील एकूण १७ जणांपैकी ९ क्रू मेंबर आणि एक जहाज पायलट यांचा मृत्यू झाला आहे. या जहाजावर भारत आणि सिरिया या देशातील कर्मचारी काम करत होते. धान्याची वाहतूक होत असताना जहाजावर झालेल्या हल्ल्यासाठी रशिया जबाबदार असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.

