UK Woman Divorces Husband : लग्नाच्या तब्बल २० वर्षांनंतर एका महिलेला तिच्या पतीचं एक मोठं गुपित कळलं. सोशल मीडियामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पतीने केलेला हा विश्वासघात सहन न झाल्याने महिलेने थेट घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.

UK Woman Divorces Husband : लग्न म्हटलं की पती-पत्नीमध्ये कोणतंही गुपित राहत नाही, असं म्हणतात. पण ब्रिटनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे एका महिलेला लग्नाच्या २० वर्षांनंतर कळलं की तिचा नवरा गुपचूप 'स्पर्म डोनर' (वीर्यदाता) म्हणून काम करत होता. यामधून तो अनेक मुलांचा बापही बनला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे सत्य तिला सोशल मीडियावरून कळलं.

२० वर्षांनी समोर आलं पतीचं सत्य

या महिलेला सोशल मीडियावर एका अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला. त्यात तिच्या पतीबद्दल धक्कादायक माहिती दिली होती. सुरुवातीला तिचा यावर विश्वास बसला नाही. पण जेव्हा तिने याबद्दल तपास केला, तेव्हा तिला कळलं की तिचा नवरा एका वेगळ्याच नावाने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सक्रिय होता. तो कोणत्याही मेडिकल सेंटर किंवा क्लिनिकमार्फत नाही, तर थेट 'स्पर्म डोनर' म्हणून स्वतःची ओळख सांगत होता. ज्या महिलांना स्पर्म डोनरची गरज आहे, त्यांना तो थेट भेटत होता, हे सत्य तिच्यासमोर आलं.

पतीला होता एक विचित्र नाद

रिपोर्ट्सनुसार, तिचा नवरा फक्त इतरांना मदत करण्यासाठी स्पर्म डोनेट करत नव्हता. तर, यातून त्याला एक प्रकारचा मानसिक आनंद मिळत होता. गर्भधारणेच्या प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यात सहभागी होण्याचा तो प्रयत्न करायचा, असं त्याच्या पत्नीने सांगितलं. गर्भवती महिलांना पाहणं आणि त्या संपूर्ण प्रक्रियेचा भाग बनणं, हे त्याच्यासाठी एक प्रकारचं वेड (mental obsession) होतं. याच कारणामुळे तो अनेक वर्षांपासून स्पर्म डोनेट करत होता.

जेव्हा पत्नीने तिच्या पतीचे पर्सनल डिव्हाइस (फोन, लॅपटॉप) तपासले, तेव्हा तिला धक्काच बसला. फोटो आणि चॅट्समधून हे स्पष्ट झालं की हा प्रकार एकदा-दोनदा नाही, तर अनेक वर्षांपासून सुरू होता. हे सगळं पाहून ती हादरली. हा एक मोठा विश्वासघात असल्याचं या महिलेने म्हटलं आहे. या घटनेनंतर तिने पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच, अशाप्रकारे कोणत्याही परवानगीशिवाय आणि अनधिकृतपणे स्पर्म डोनेशन करण्यापासून दूर राहण्याचा इशाराही तिने इतर महिलांना दिला आहे.

अशाप्रकारे स्पर्म डोनेशन धोकादायक

तज्ज्ञांच्या मते, अशा अनधिकृत स्पर्म डोनेशनमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय वीर्यदान केल्यास अनेक प्रकारचे आजार पसरण्याची शक्यता असते. यासोबतच, अनुवांशिक आजारांचा धोकाही असतो. त्यामुळे, स्पर्म डोनेशन नेहमी कायदेशीर प्रक्रियेद्वारेच करावं, असा सल्ला तज्ज्ञ देतात.