रॅपलिंग करताना एक पर्यटक भयंकर धबधब्याखाली जवळपास पाच मिनिटं अडकला होता. या घटनेत तो जखमी झाला असून त्याला तीव्र मानसिक धक्क्याचं निदान झालं आहे.

बिजिंग : चीनच्या मध्य भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. १५ ऑगस्ट रोजी यांगजियाओतान (Yangjiaotan) धबधब्याच्या परिसरात रॅपलिंग करताना एक पर्यटक जवळपास पाच मिनिटं पाण्याच्या जोरदार प्रवाहाखाली अडकून पडला. तो हवेत लटकलेल्या अवस्थेत होता आणि त्याच्या डोक्यावरून पाण्याचा प्रचंड मारा होत होता. चीनमधील या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

तांग (Tang) असं या पर्यटकाचं नाव आहे. तो या ॲक्टिव्हिटीसाठी खाली उतरणारा पहिलाच व्यक्ती होता. दोरीच्या साहाय्याने अर्ध्या वाटेवर पोहोचताच पाण्याचा प्रवाह इतका वाढला की तो तिथेच अडकला. खाली असलेल्या खडकांवर आदळू नये म्हणून तो जीवाच्या आकांताने धडपडत होता, पण पाण्याच्या माऱ्यामुळे तो गोल-गोल फिरत होता.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, गाईडने त्याला तीन मिनिटांतच वाचवलं. पण पर्यटकाने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.

तांगने सांगितलं की, 'पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे माझा श्वास गुदमरत होता. अनेकदा पाणी नाका-तोंडात गेलं. पाण्याच्या प्रवाहाचा जोर जास्त असूनही इन्स्ट्रक्टरने मला खाली जाण्यास सांगितलं होतं. पाण्याच्या जोरदार तडाख्याने मी अनेकदा प्रवाहाखाली बुडालो.'

या घटनेत तांगच्या शरीरावर अनेक ठिकाणी खरचटलं आणि त्याला मुका मारही लागला. झेंगझोऊ (Zhengzhou) शहरात परतल्यावर त्याला चालणंदेखील कठीण झालं होतं, त्यामुळे त्याने हॉस्पिटलमध्ये मदतीची मागणी केली. त्यानंतर त्याला दोन दिवस मानसोपचार विभागात (psychological medicine department) दाखल करण्यात आलं, जिथे त्याला 'ॲक्युट स्ट्रेस रिॲक्शन' (acute stress reaction) म्हणजे तीव्र मानसिक धक्का बसल्याचं निदान झालं.

View post on Instagram

तांगचा आरोप आहे की, परत येताना ग्रुप लीडरने त्याची विचारपूसही केली नाही. त्याने बुडालेल्या पगाराची, मानसिक त्रासाची आणि वाहून गेलेल्या वैयक्तिक सामानाची नुकसान भरपाई मागितली आहे. मात्र, कंपनीने त्याचे अनेक दावे फेटाळून लावले आहेत.

कंपनीचे मॅनेजर गुओ (Guo) यांनी सांगितलं की, गाईडने वेगाने हालचाल करत तांगला जवळपास तीन मिनिटांतच वाचवलं. गाईडने त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्या कंबरेभोवती एक लाल निशाण दिसलं. त्यावेळी तांगने आपल्याला चक्कर येत असून मळमळत असल्याचं सांगितलं होतं.

मानसिक त्रासाच्या भरपाईसाठी कोणताही वैद्यकीय पुरावा नसल्याने कंपनीने त्याची मागणी नाकारली. कंपनीने बुकिंगची रक्कम परत देण्याची, काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची आणि उपचाराचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली, पण दोघांमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही.

गुओ म्हणाले, 'मानसिक आघात लहान किंवा मोठा असू शकतो. त्यासाठी एक मानक असणं गरजेचं आहे. एकदा उपचार पूर्ण झाल्यावर, वैद्यकीय निदानाच्या आधारावर आपण या विषयावर चर्चा करू शकतो.'

या घटनेनंतर, आयोजित ग्रुप्ससाठी हा धबधब्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने सांगितलं की, ही घटना एका अविकसित (undeveloped) भागात घडली असून ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत.