नाटोच्या धर्तीवर सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की हे देश लष्करी युतीसाठी चर्चा करत आहेत. या करारानुसार सौदी आर्थिक मदत, पाकिस्तान अण्वस्त्र संरक्षण आणि तुर्की लष्करी तंत्रज्ञान पुरवणार आहे.
दिल्ली : युरोपीय देशांची लष्करी संघटना असलेल्या नाटोच्या धर्तीवर सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की हे देश युती करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे, असं ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटलं आहे. सध्याच्या सौदी अरेबिया-पाकिस्तान सुरक्षा करारामध्ये सामील होण्यासाठी तुर्की चर्चा करत आहे. या प्रस्तावित करारानुसार, नाटोच्या कलम पाचप्रमाणेच, कोणत्याही एका सदस्य देशावरील हल्ला हा सर्व देशांवरील हल्ला मानला जाईल, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
सौदी आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या मूळ करारात आता तुर्कीला सामील करून घेण्यावर गांभीर्याने विचार सुरू आहे. या युतीमध्ये सौदी अरेबिया आर्थिक पाठबळ देईल, पाकिस्तान अण्वस्त्र संरक्षण पुरवेल आणि तुर्की क्षेपणास्त्रांसह लष्करी मदत देईल. तुर्की आपले लष्करी कौशल्य आणि स्वदेशी संरक्षण उद्योगही यात सामील करेल, असे अंकारा येथील थिंक टँक TEPAV चे रणनीतीकार निहात अली ओझकान यांनी सांगितले.
या प्रदेशात स्वतःच्या आणि इस्रायलच्या हिताला प्राधान्य दिले जात असल्याने, बदलत्या परिस्थितीत मित्र आणि शत्रूंना ओळखण्यासाठी नवीन यंत्रणा विकसित करण्यास देशांना भाग पाडले जात आहे, असे ओझकान म्हणाले. दक्षिण आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तानच्या सामरिक हितांशी तुर्कीचे हित वाढत आहे. त्यामुळे ही विस्तारित युती एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पहिली नौदल बैठक
या तिन्ही देशांनी आधीच अधिक जवळून समन्वय साधण्यास सुरुवात केली आहे आणि या आठवड्याच्या सुरुवातीला अंकारामध्ये त्यांची पहिली नौदल बैठक झाली. तुर्की हा अमेरिका-प्रणित नाटो युतीचा दीर्घकाळ सदस्य आहे. सौदी अरेबिया आणि तुर्की या दोघांनाही शियाबहुल इराणबद्दल चिंता आहे आणि ते लष्करी कारवाईचे समर्थन करतात. सुन्नी नेतृत्वाखालील सीरियाला पाठिंबा देण्यावर आणि पॅलेस्टिनी राष्ट्राच्या मागणीवरही दोन्ही देशांचे एकमत आहे.
दरम्यान, पाकिस्तानसोबतचे तुर्कीचे संरक्षण संबंधही मजबूत झाले आहेत. अंकारा पाकिस्तानी नौदलासाठी कॉर्व्हेट युद्धनौका तयार करत आहे. तुर्कीने पाकिस्तानची डझनभर F-16 लढाऊ विमाने अपग्रेड केली आहेत. पाकिस्तान सौदीसोबत ड्रोन तंत्रज्ञान शेअर करत आहे. या त्रिपक्षीय संरक्षण चर्चेकडे 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये तुर्कीने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला होता. त्यामुळे भारत या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.


