Returning from Gulf to India Be Aware of These NRI Tax Rules: मध्य पूर्वेतील तणावामुळे अनेक NRI भारतात परतण्याचा विचार करत आहेत. पण भारतात जास्त दिवस राहिल्यास तुमचा NRI दर्जा जाऊ शकतो आणि तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागू शकतो. हे नियम सोप्या भाषेत समजून घेऊया.
Returning from Gulf to India Be Aware of These NRI Tax Rules: इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे मध्य-पूर्वेतील वातावरण तापलं आहे. त्यामुळे गल्फ देशांमध्ये काम करणारे अनेक भारतीय तात्पुरते किंवा कायमचे मायदेशी परतण्याचा विचार करत आहेत. पण सुरक्षितपणे मायदेशी परतताना अनेक जण एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात - ती म्हणजे भारतातील इन्कम टॅक्सचे नियम. भारतात तुम्ही किती दिवस राहता यावर तुमचा 'NRI' दर्जा अवलंबून असतो आणि थोडीशी चूक झाल्यास तुम्हाला मोठा टॅक्स भरावा लागू शकतो.
तुमचा टॅक्स स्टेटस कसा बदलतो?
भारताच्या कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीचा टॅक्स त्याच्या भारतातल्या वास्तव्यावर अवलंबून असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर तुम्ही एका आर्थिक वर्षात (१ एप्रिल ते ३१ मार्च) १८२ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस भारतात राहिलात, तर तुम्हाला 'निवासी भारतीय' (Resident Indian) मानलं जातं. दुसरा नियम असा आहे की, जर तुम्ही एका वर्षात ६० दिवसांपेक्षा जास्त आणि गेल्या चार वर्षांत मिळून ३६५ दिवसांपेक्षा जास्त भारतात राहिला असाल, तरीही तुम्हाला निवासी भारतीय मानलं जातं.
NRI लोकांसाठी खास सूट
जे भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाचे लोक फक्त भेटीसाठी भारतात येतात, त्यांच्यासाठी सरकारनं काही सूट दिली आहे. त्यांच्यासाठी ६० दिवसांची अट लागू होत नाही. ते थेट १८२ दिवसांपर्यंत भारतात राहू शकतात आणि तरीही त्यांचा NRI दर्जा कायम राहतो.
१५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर सावधान!
पण ही १८२ दिवसांची सूट सगळ्यांनाच मिळत नाही. जर तुमचं भारतातून मिळणारं उत्पन्न (उदा. भाडं, व्यवसाय किंवा इतर गुंतवणूक) वर्षाला १५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुमच्यासाठी ही मर्यादा १२० दिवसांवर येते. म्हणजेच, १५ लाखांपेक्षा जास्त भारतीय उत्पन्न असलेला NRI जर १२० दिवसांपेक्षा जास्त भारतात राहिला, तर त्याचा टॅक्स स्टेटस बदलतो.
RNOR स्टेटस म्हणजे काय?
जे लोक १२० दिवसांपेक्षा जास्त पण १८२ दिवसांपेक्षा कमी भारतात राहतात, त्यांना 'निवासी पण सामान्यतः निवासी नाही' (Resident but Not Ordinarily Resident - RNOR) असं म्हटलं जातं. या स्टेटसचा एक फायदा आहे. अशा लोकांना त्यांच्या परदेशातील उत्पन्नावर भारतात टॅक्स भरावा लागत नाही. पण भारतातील उत्पन्नावर मात्र टॅक्स द्यावाच लागतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रवासाचा दिवस सुद्धा भारतात घालवलेला पूर्ण दिवस मानला जातो.
NRI लोकांनी काय काळजी घ्यावी:
प्रवासाची कागदपत्रं सांभाळून ठेवा: पासपोर्टवरील शिक्के आणि प्रवासाच्या तारखा व्यवस्थित जपून ठेवा.
दिवसांची मोजणी करा: आर्थिक वर्ष संपताना तुम्ही भारतात १२० किंवा १८२ दिवसांपेक्षा जास्त राहिलात का, हे तपासा.
जागतिक उत्पन्नावर लक्ष ठेवा: जर तुम्ही 'निवासी भारतीय' झालात, तर तुमच्या परदेशातील उत्पन्नावरही भारतात टॅक्स लागू शकतो.
युद्धजन्य परिस्थिती किंवा इतर कारणांमुळे तुमचा भारतातील मुक्काम अनपेक्षितपणे वाढल्यास, टॅक्स रिटर्न भरताना ऐनवेळी धक्का बसू नये म्हणून आत्ताच योग्य नियोजन करा, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.


