सार

आयईडी स्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बलुचिस्तान प्रांतातील हरनाई येथील खाणीत काम करणाऱ्या कामगारांना घेऊन जाणारी गाडी होती.

इस्लामाबाद: नैऋत्य पाकिस्तानातील कोळशाच्या खाणीजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ९ कामगार ठार झाले. बॉम्बस्फोटात हे सर्व कामगार मृत्युमुखी पडले. अनेक जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू असल्याचे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे. खाण कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर हा हल्ला झाला. बलुचिस्तान प्रांतातील वरिष्ठ सरकारी अधिकारी सलीम तारिन यांनी एएफपीला सांगितले की, या हल्ल्यात नऊ कामगार ठार झाले असून सात जण जखमी झाले आहेत.

आयईडी स्फोट झाल्याचेही त्यांनी सांगितले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बलुचिस्तान प्रांतातील हरनाई येथील खाणीत काम करणाऱ्या कामगारांना घेऊन जाणारी ही गाडी होती. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. बॉम्बस्फोट झाला तेव्हा ट्रकमध्ये १७ खाण कामगार होते, असे या भागातील उपायुक्त हजरत वली आगा यांनी सांगितले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे स्थानिक रुग्णालयातील एका डॉक्टरने सांगितले.