Pakistan Army Chief Asim Munir Daughter Marries Nephew : पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची मुलगी महनूर हिचा विवाह रावळपिंडीमध्ये अत्यंत गुप्तपणे पार पडला.
Pakistan Army Chief Asim Munir Daughter Marries Nephew : पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची मुलगी महनूर हिचा विवाह २६ डिसेंबर रोजी पार पडला. असीम मुनीर यांनी आपल्या भावाच्या मुलालाच आपला जावई बनवले आहे. महनूरचा विवाह तिचा चुलत भाऊ अब्दुल रहमान याच्याशी झाला आहे. हा विवाह सोहळा रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात पार पडला. या सोहळ्याला पाकिस्तानचे उच्चपदस्थ राजकीय नेते आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते. मात्र, या सोहळ्याची सर्व माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. लग्नाचे कोणतेही फोटो प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत.
या विवाहाला पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी, पंतप्रधान शेहबाज शरीफ, उपपंतप्रधान इशाक दार, आयएसआय प्रमुख आणि निवृत्त जनरल तसेच माजी प्रमुखांसह पाकिस्तानी लष्कराचे इतर सदस्य उपस्थित होते.
असीम मुनीर यांचा भाचा अब्दुल रहमान हा देखील पाकिस्तानी लष्करात कॅप्टन पदावर कार्यरत होता. नंतर, लष्करी अधिकाऱ्यांसाठी राखीव कोट्यातून तो नागरी सेवेत दाखल झाला आणि सध्या सहायक आयुक्त म्हणून कार्यरत आहे. पाकिस्तानी पत्रकार जाहिद गिष्कोरी यांच्या मते, लग्नाला ४०० पाहुणे आले होते, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ते गुप्त ठेवण्यात आले होते. असीम मुनीर यांना एकूण चार मुली असून, महनूर ही त्यांची तिसरी मुलगी आहे.
पाकिस्तानच्या प्रशासनावर जगाचा आक्षेप
ग्रीक सिटी टाइम्सच्या वृत्तानुसार, मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान 'धार्मिक कट्टरते'कडे वेगाने वाटचाल करत आहे. 'पाकिस्तान अधिक धर्मशासित आणि संघर्षमय ओळखीकडे वळला आहे. परदेशात इस्लामी 'प्रतिकारा'चे उदात्तीकरण करत आहे आणि देशातील कट्टरवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरला आहे. लंडनपासून न्यूयॉर्क ते दुबईपर्यंत, याचे परिणाम रक्तपात आणि प्रत्युत्तराच्या हल्ल्यांमध्ये दिसून येत आहेत,' असे या अहवालात म्हटले आहे.
'एशियन न्यूज पोस्ट'च्या वृत्तानुसार, इस्लामाबादची लष्कर-प्रणित रणनीती पाकिस्तानच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात, नागरिकांचे संरक्षण करण्यात आणि परदेशात सलोखा निर्माण करण्यात अपयशी ठरली आहे. उलट, यामुळे मोठ्या प्रमाणात दुःख, मानवी संकटांना प्रोत्साहन मिळाले आहे आणि मोठा प्रदेश अस्थिर झाला आहे, असे म्हटले आहे.


