न्यूयॉर्कमधील 'बिलियनेअर्स रो'वर असलेल्या एका गगनचुंबी इमारतीवर १८ वर्षांच्या एका तरुणीने बाहेरून चढाई केल्याचा प्रकार घडला. या लक्झरी इमारतीच्या अगदी वरच्या मजल्यांजवळ तिला पकडण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.
न्यूयॉर्कमधील 'बिलियनेअर्स रो'वर असलेल्या एका गगनचुंबी इमारतीवर १८ वर्षांच्या एका तरुणीने बाहेरून चढाई केल्याचा प्रकार घडला. या लक्झरी इमारतीच्या अगदी वरच्या मजल्यांजवळ तिला पकडण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. पण, या गंभीर आरोपांची तिला अजिबात पर्वा नाही. न्यूयॉर्क शहराचा अद्भुत नजारा पाहण्यासाठी आपण हा स्टंट केल्याचं तिने म्हटलं आहे.
पोर्टलँड, ओरेगॉन येथील विव्हियन वॉर्नोक या तरुणीवर सेंट्रल पार्कसमोर असलेल्या १११ वेस्ट ५७ व्या स्ट्रीटवरील १४२८ फूट उंच स्टेनवे टॉवरमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचा आरोप आहे. सोमवारी तिला मॅनहॅटन क्रिमिनल कोर्टात हजर करण्यात आलं.
कोर्टातून बाहेर आल्यावर 'द न्यूयॉर्क पोस्ट'शी बोलताना वॉर्नोकला या घटनेचं फारसं गांभीर्य वाटलं नाही. इमारतीचं आणि तिथल्या श्रीमंत रहिवाशांचं वर्णन करत तिने काहीही घडलं नसल्याचं सांगितलं.
“ती एक श्रीमंत इमारत आहे आणि तिथे भरपूर श्रीमंत लोक राहतात. काहीही झालं नाही, पण इथून दिसणारा नजारा खूपच छान आहे,” असं ती म्हणाली.
जामिनावर सुटल्यानंतर ही तरुणी ब्राउन लेदर जॅकेट घालून आरामात सिगारेट ओढताना दिसली. पोलिसांच्या हस्तक्षेप करण्यापूर्वी आपण फक्त “काही मजलेच” चढल्याचा दावा तिने केला.
“मी खूप कूल आहे आणि मी एक 'फ्री स्पिरीट' आहे. हे त्यांना सहन होत नाही, म्हणूनच त्यांनी मला अटक केली,” असं वॉर्नोक म्हणाली. ती स्वतःला पॅलेस्टाईन समर्थक आणि ICE (इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट) विरोधी असल्याचं सांगते.
लक्झरी इमारतीवर चढताना तरुणीला पकडलं
'द न्यूयॉर्क पोस्ट'ने दिलेल्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, वॉर्नोकला इमारतीच्या बाहेरील बाजूने वरच्या मजल्यांजवळ चढताना पकडलं. पण ती या टॉवरमध्ये कशी शिरली किंवा पकडले जाण्यापूर्वी ती किती वरपर्यंत चढली होती, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
हा प्रकार मॅनहॅटनमधील सर्वात प्रसिद्ध गगनचुंबी इमारतींपैकी एक असलेल्या स्टेनवे टॉवरमध्ये घडला. या लक्झरी निवासी इमारतीमधील घरे खूप महाग आहेत. नुकताच येथील एका डुप्लेक्स पेंटहाऊसचा सुमारे ४२ दशलक्ष डॉलर्सचा (जवळपास ३५० कोटी रुपये) करार झाला आहे.
आपण न्यूयॉर्क शहर “पाहण्यासाठी” आलो होतो आणि या घटनेपूर्वी साधारण आठवडाभर शहरात फिरलो, असं वॉर्नोकने या वृत्तपत्राला सांगितलं.
हा स्टंट जीवावर बेतणारा असला तरी, गगनचुंबी इमारतीवरून आणि सेंट्रल पार्कमधून दिसणारा नजारा “सुंदर” आणि “अद्भुत” असल्याचं तिने सांगितलं.
“मला न्यूयॉर्क खूप आवडतं,” असं ही तरुणी म्हणाली.
तरुणीवर घुसखोरीचा गुन्हा दाखल
वॉर्नोकवर 'क्रिमिनल ट्रेसपास इन द थर्ड डिग्री' (तिसऱ्या दर्जाची घुसखोरी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यूयॉर्कमध्ये हा क्लास बी मधील गुन्हा (misdemeanour) असून, यासाठी जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आरोप निश्चित झाल्यानंतर तिला जामिनावर सोडण्यात आलं आहे.
काही महिन्यांपूर्वीच अँजेला निकोलाऊ आणि इव्हान कुझनेत्सोव्ह या जोडप्याने एम्पायर स्टेट बिल्डिंगवर चढून खळबळ उडवून दिली होती. या दोघांनी त्यांच्या नेटफ्लिक्स शोच्या प्रमोशनसाठी आणि “प्रेमाचा” संदेश देण्यासाठी जीव धोक्यात घालून ही चढाई केल्याचं बोललं जात होतं.












