सार
बंदूक बेजबाबदारपणे हाताळल्याबद्दल प्रियकराला अटक करण्यात आली.
कॅलिफोर्निया: दोन वर्षाच्या मुलाच्या हातातील बंदूक अचानक सुटल्याने आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. महिलेच्या प्रियकराची ही बंदूक होती. बंदूक बेजबाबदारपणे हाताळल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे घडली.
झोपण्याच्या खोलीत दोन वर्षाचा मुलगा खेळत असताना त्याने चुकून बंदूक चालवली. गोळी त्याच्या आई जेसिनिया मिना यांना लागली. जेसिनिया यांना आठ महिन्यांची मुलगी देखील आहे.
जेसिनियाचा १८ वर्षीय प्रियकर अँड्र्यू सांचेझ याने ९ एमएमची पिस्तूल बेजबाबदारपणे बेडरूममध्ये ठेवल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तीच बंदूक मुलाच्या हाती लागली आणि सुटली. सांचेझला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले. फ्रेस्नो पोलिसांनी सांगितले की, ज्या बंदूकीने गोळी झाडली ती जप्त करण्यात आली आहे.
गोळी लागल्यानंतर मिना यांना फ्रेस्नो येथील स्थानिक वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना अत्यंत दुःखद आणि टाळता येणारी होती, असे पोलिसांनी सांगितले.