तिबेटची नैसर्गिक संकटांतून सुटका होताना दिसत नाहीये. काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुराच्या आठवणी ताज्या असतानाच, आता पुन्हा एकदा तिबेट भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं आहे. गुरुवारी रात्री येथे सलग दोन मोठे भूकंप झाले. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा नुकसानीची माहिती समोर आलेली नाही, पण लोकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.

Tibet Earthquake News: तिबेटमध्ये गुरुवारी रात्री सलग दोन भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पहिला धक्का रिश्टर स्केलवर ७.० तीव्रतेचा होता. त्यानंतर काही वेळातच ५.० तीव्रतेचा दुसरा धक्का बसला. भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (National Center for Seismology) दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री चीनमध्येही (China) ५.२ तीव्रतेचा भूकंप झाला. भारतीय वेळेनुसार, रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी तिबेटमध्ये ७.० तीव्रतेचा पहिला भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) पांगिनपासून ४८९ किलोमीटर उत्तर-वायव्येला आणि जमिनीखाली १७३ किलोमीटर खोल होता. त्यानंतर रात्री ८ वाजून ४२ मिनिटांनी त्याच भागात ५.० तीव्रतेचा दुसरा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील बसरपासून ३२३ किलोमीटर उत्तर-वायव्येला आणि जमिनीखाली १५ किलोमीटर खोल होता. याशिवाय, रात्री ८ वाजून २९ मिनिटांनी चीनमध्येही ५.२ तीव्रतेचा भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील पांगिनपासून ५०५ किलोमीटर उत्तर-वायव्येला आणि जमिनीखाली १५ किलोमीटर खोल होता.

ऑगस्टमध्ये नेपाळ-तिबेटमध्ये आलं होतं मोठं संकट

या वर्षी ऑगस्ट महिन्यात नेपाळ-तिबेट सीमेवर ढगफुटी आणि भूस्खलनामुळे मोठं नुकसान झालं होतं. या नैसर्गिक आपत्तीत १४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही आठवडेच उलटले असताना आता पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ऑगस्टमध्ये आलेल्या पुरामुळे नेपाळच्या उत्तर आणि मध्य भागातील अनेक घरे आणि इमारती वाहून गेल्या होत्या. आता तिबेट आणि चीनमध्ये सलग भूकंप होत असल्याने हिमालयीन पट्ट्यातील नैसर्गिक धोक्यांबद्दल चिंता वाढली आहे.

नुकसानीची अद्याप माहिती नाही

गुरुवारी रात्री तिबेट आणि चीनमध्ये झालेल्या या भूकंपांमुळे नेमकं किती नुकसान झालंय किंवा कुणी जखमी झालंय का, याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सकाळपर्यंत याबद्दलचे सविस्तर अपडेट्स मिळण्याची शक्यता आहे.