निमिषा प्रिया हिला येमेनमधील एका नागरिकाच्या खूनप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. १६ जुलै २०२५ रोजी फाशी देण्याची तारीख निश्चित झाली होती. मात्र, आज झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये ही फाशी स्थगित करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - केरळच्या नर्स निमिषा प्रिया, जी सध्या येमेनमधील तुरुंगात मृत्युदंडाची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या फाशीची अंमलबजावणी सध्या स्थगित करण्यात आली आहे. ही माहिती निमिषा प्रिया अ‍ॅक्शन कौन्सिलने जाहीर केली असून, त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या संघटनांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे.

फाशी १६ जुलै रोजी होणार होती

निमिषा प्रिया यांना येमेनमधील एका नागरिकाच्या खूनप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. १६ जुलै २०२५ रोजी फाशी देण्याची तारीख निश्चित झाली होती. मात्र, आज झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये ही फाशी स्थगित करण्यात आली आहे.

भारत सरकारचा महत्त्वपूर्ण हस्तक्षेप

भारत सरकारने या प्रकरणात सुरुवातीपासूनच शक्य ते सर्व सहकार्य केले असल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांत केंद्र सरकारने विशेष प्रयत्न करून निमिषाच्या कुटुंबीयांना आणि संबंधित पक्षाला परस्पर सहमतीने तोडगा काढण्यासाठी वेळ मागितला होता.

सरकारी निवेदनात म्हटले आहे की

"निमिषा प्रिया यांच्या प्रकरणात येमेनमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी १६ जुलै रोजी होणारी फाशी स्थगित केली आहे. भारत सरकारच्या अधिकारी वर्गाने स्थानिक तुरुंग प्रशासन व सरकारी वकिलांशी सतत संपर्कात राहून ही स्थगिती मिळवण्यात यश मिळवले आहे."

स्थानिक मानवाधिकार कार्यकर्त्यांचा पाठिंबा

येमेनचे मानवी हक्क कार्यकर्ते सॅम्युअल जेरो यांनी देखील या स्थगितीची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, "आज झालेल्या चर्चेनंतर फाशीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

येत्या काही दिवसांत कुटुंब आणि स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये आणखी वाटाघाटी होणार आहेत.

निमिषा प्रिया आहेत कोण?

निमिषा प्रिया या केरळमधील नर्स असून त्या नोकरीनिमित्त येमेनमध्ये गेल्या होत्या. तेथे तिच्या एका स्थानिक नागरिकासोबत वाद झाला आणि त्यानंतर त्या नागरिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

न्यायालयाने त्यांना खूनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

'ब्लड मनी' आणि सौहार्दपूर्ण तोडग्याचा प्रयत्न

या प्रकारात 'ब्लड मनी' (पिडीत कुटुंबाला नुकसानभरपाई देऊन माफीनामा घेण्याची प्रक्रिया) लागू शकते. निमिषाच्या कुटुंबीयांना त्यासाठी वेळ मिळावा, म्हणून भारत सरकारने फाशी स्थगित करण्याचा आग्रह धरला होता.

पुढे काय?

यापुढे येमेनमधील न्यायालय आणि पीडित कुटुंबाच्या सहमतीने तोडगा काढण्याचे प्रयत्न होतील. भारत सरकार आणि निमिषाच्या कुटुंबीयांकडून 'ब्लड मनी' संकलन आणि माफीसाठी चर्चा होईल. फॉरेन्सिक, पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया यांचाही आढावा घेण्यात येईल.

निमिषा प्रिया यांच्या फाशीला मिळालेली ही स्थगिती फाशीपासून वाचवणाऱ्या आणि न्यायासाठी लढणाऱ्या संघटनांना आशेचा किरण देणारी आहे. पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, भारत सरकारकडून उच्च पातळीवर प्रयत्न सुरू राहणार आहेत.

ही केस केवळ एका भारतीय महिलेचा जीव वाचवण्यापुरती मर्यादित नसून, जागतिक स्तरावर भारताच्या मानवाधिकार व न्यायनितीच्या भूमिकेचं प्रतिबिंबही आहे.