कझाकस्तानमधील एका शाळेत ११ वर्षांच्या मुलाचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून रेलिंगवरून घसरताना तो खाली पडला. गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कझाकस्तानमधील एका शाळेत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कझाकस्तानमध्ये एका ११ वर्षांच्या मुलाचा शाळेतील जिन्याच्या रेलिंगवरून घसरताना तोल जाऊन मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामुळे शाळेतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सहावीत शिकणारा हा मुलगा तिसऱ्या मजल्यावरून थेट दुसऱ्या मजल्यावरील लँडिंगवर पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली आणि त्याला अतिदक्षता विभागात ठेवले. मात्र, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी कझाकस्तानच्या अल्माटी प्रांतातील कोनायेव शहरातील एका शाळेत ही घटना घडली.
असे सांगितले जात आहे की, शाळेच्या सुट्टीत हा मुलगा तिसऱ्या मजल्यावरून जिन्याच्या रेलिंगवरून घसरण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याचा हात सुटला आणि तो खाली पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. शाळेच्या प्रशासनाने तातडीने वैद्यकीय मदत बोलावली आणि एका रुग्णवाहिकेतून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, सीसीटीव्हीत कैद
शाळेतील सीसीटीव्ही फुटेज ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. कोनायेव सिटी एज्युकेशन डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, शाळेत २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि ही घटना सुरक्षा प्रणालीत रेकॉर्ड झाली आहे.
अटकळीनुसार, हा मुलगा स्टंट करत असताना तो एकटाच होता. फुटेजमध्ये कोणीही त्याला धक्का दिल्याचे, मारहाण केल्याचे किंवा त्याच्यावर शारीरिक हल्ला केल्याचे दिसत नाही. या व्हिडीओमुळे बहुमजली इमारतींमध्ये, विशेषतः जिन्यांवर धोकादायक स्टंट करण्याच्या धोक्यांकडे लक्ष वेधले गेले आहे.
डॉक्टरांनी केली आपत्कालीन शस्त्रक्रिया, पण...
खाली पडल्यानंतर या ११ वर्षीय मुलाला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे डॉक्टरांनी स्थानिक, शहर आणि राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची मदत घेतली.
१७ नोव्हेंबर रोजी वैद्यकीय पथकाने त्याचा जीव वाचवण्यासाठी आपत्कालीन शस्त्रक्रिया केली. मात्र, अतिदक्षता उपचार, शस्त्रक्रिया आणि इतर प्रयत्नांनंतरही त्याची प्रकृती गंभीरच राहिली. अखेर १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेनंतर, अल्माटी रिजन एज्युकेशन डिपार्टमेंटने मुलाचे कुटुंबीय, मित्र, वर्गमित्र आणि शिक्षकांचे सांत्वन केले.
पाहा धक्कादायक व्हिडीओ
शाळेतील मुलाच्या मृत्यूची पोलिसांकडून चौकशी
या अपघातामागील नेमकी कारणे शोधण्यासाठी प्रशासनाने तपास सुरू केला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत असून अधिकारी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि शाळेतील सुरक्षेच्या व्यवस्थेची तपासणी करणार आहेत. या दुर्घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील मुलांच्या सुरक्षेचे महत्त्व आणि जिन्यांवर, रेलिंगवर किंवा इतर उंचावरील ठिकाणी धोकादायक गोष्टी टाळण्याची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे.














