सार
हिरवा, पिवळा आणि सोनेरी रंगांच्या तीन खास डिझाइन केलेल्या शवपेट्या उपलब्ध आहेत. या सुंदर सजवलेल्या शवपेट्यांमध्ये इच्छुकांना झोपण्याचा अनुभव घेता येतो.
ऐकायला विचित्र वाटलं तरी जपानमधील एका अंत्यसंस्कार गृहाने (फ्युनरल होम) एक अनोखी सेवा सुरू केली आहे. १२० वर्षे जुन्या या संस्थेने सुरू केलेल्या 'कॉफिन कॅफे' सेवेची सध्या चर्चा आहे.
या सेवेअंतर्गत लोकांना शवपेटीत झोपून फोटो काढण्याची संधी दिली जाते. लोकांना जीवन आणि मृत्यूबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करणे हा आपला उद्देश असल्याचे ते सांगतात.
१९०२ मध्ये स्थापन झालेल्या चिबा प्रांतातील फुट्सू येथील काजिया होंटेन नावाच्या अंत्यसंस्कार गृहाने दुसऱ्या एका कंपनीच्या सहकार्याने ही सेवा सुरू केली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात ही सेवा सुरू झाली. हिरवा, पिवळा आणि सोनेरी रंगांच्या तीन खास डिझाइन केलेल्या शवपेट्या येथे उपलब्ध आहेत. या सुंदर सजवलेल्या शवपेट्यांमध्ये इच्छुकांना झोपून पाहता येते.
या सेवेसाठी २,२०० येन (US$१४) म्हणजेच सुमारे १२०० भारतीय रुपये शुल्क आकारले जाते. साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, दररोज अनेक लोक ही सेवा वापरतात, ज्यात शवपेटीत एकत्र झोपून फोटो काढणारे जोडपेही आहेत.
२४ व्या वर्षी वडिलांच्या अचानक मृत्यूमुळे आलेल्या वैयक्तिक अनुभवातून ही कल्पना सुचली, असे कंपनीचे ४८ वर्षीय अध्यक्ष कियोटका हिरानो यांनी सांगितले. आणखी एका खास गोष्ट म्हणजे, लोकांना त्यांची आवडती शवपेटी आधीच पाहून बुक करण्याची सुविधाही कियोटका हिरानो यांच्या या अंत्यसंस्कार गृहात आहे.