Iran School Attack: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. दक्षिण इराणच्या मिनाब शहरातील मुलींच्या प्राथमिक शाळेवर एक मिसाईल पडलं. यात 40 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून 45 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Tehran School Attack: इस्रायलने शनिवारी इराणवर मोठा हल्ला केला. राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर मिसाईल डागण्यात आली. याच हल्ल्यादरम्यान, दक्षिण इराणच्या होर्मुझगान प्रांतातील मिनाब शहरात एक मोठी दुर्घटना घडली. इथल्या मुलींच्या एका प्राथमिक शाळेवर मिसाईल पडल्याने तब्बल 40 विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला. तर 45 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA (इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सी) ने ही माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, या मिसाईलचं खरं लक्ष्य जवळच असलेला 'रेव्होल्यूशनरी गार्ड'चा तळ होता, पण ते चुकून शाळेच्या इमारतीवर आदळलं. या हल्ल्यात शाळेची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून आसपासच्या परिसराचंही मोठं नुकसान झालं आहे.
हल्ला कधी आणि कसा झाला?
स्थानिक रिपोर्ट्सनुसार, हा हल्ला अगदी अचानक झाला. शाळेत मुलींचा वर्ग सुरू होता, त्याचवेळी एका मोठ्या स्फोटाचा आवाज आला. काही सेकंदातच संपूर्ण शाळा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. बचाव पथकांनी कित्येक तास ढिगारा उपसून लोकांना बाहेर काढलं. जखमी मुलींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.
इराणचा पलटवार
तेहरान आणि इतर शहरांवर झालेल्या हल्ल्यानंतर इराणनेही लगेचच प्रत्युत्तर दिलं. आखाती प्रदेशात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करत अनेक मिसाईल डागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणने ४०० पेक्षा जास्त मिसाईल्सने हल्ला केला आहे. हे हल्ले कुवेत, बहरीन, यूएई आणि कतारमधील अमेरिकन तळांवर करण्यात आले. एवढंच नाही, तर इराणने यूएईमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दुबई शहरावरही हल्ला केल्याचं वृत्त आहे. यूएईमधील हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे, पण यावर अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
हे पण वाचा- US-Israel Iran Strikes Video: अमेरिका-इस्रायल हल्ल्याला इराणचं प्रत्युत्तर, पाहा मिसाईल हल्ल्याचा व्हिडिओ
हे पण वाचा-Iran vs US-Israel Conflict: बाबा वेंगाची तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी खरी ठरतेय का?


