Iran Claims Successful Strike on US F 35 Stealth Jet : जगातील सर्वात आधुनिक आणि अदृश्य समजल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या F-35 लाईटनिंग-2 या विमानावर हल्ला करण्यात इराणला यश आलं आहे. अमेरिकेच्या लष्करी प्रतिष्ठेला हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

Iran Claims Successful Strike on US F 35 Stealth Jet : इराणने अमेरिकेच्या सर्वात प्रतिष्ठित आणि 'अदृश्य' मानल्या जाणाऱ्या F-35 लाईटनिंग-2 या स्टेल्थ विमानावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. ज्या विमानावर कोणी हल्ला करू शकत नाही, जे कोणाच्या नजरेत येत नाही, अशी ज्याची ओळख होती, त्याच विमानाला इराणने लक्ष्य केलं आहे. गेल्या ३ आठवड्यांपासून इराण आपल्या स्वस्त ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी अमेरिकेचे रडार, विमानं आणि युद्धनौकांवर सातत्याने हल्ले करत होता. आता F-35 वरील हल्ल्यामुळे अमेरिकेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे.

९५० कोटी रुपये किमतीचं ५व्या पिढीचं विमान

हे पाचव्या पिढीचं विमान असून त्याची किंमत जवळपास ९५० कोटी रुपये आहे. अशा विमानावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, हा हल्ला होऊनही विमान कोसळण्यापासून वाचलं आणि मध्य-पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळावर सुरक्षितपणे परतलं आहे. विमानाचा पायलट सुरक्षित असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. पण, इराणच्या हल्ल्यामुळे विमानाचं नुकसान झालं आहे, हे अमेरिकेने अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही.

दुसरीकडे, इराणने या हल्ल्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. 'आम्ही F-35 वर यशस्वी हल्ला केला आहे. F-35 हे फक्त एक लढाऊ विमान नाही, तर ते अमेरिकेच्या लष्करी अहंकाराचं प्रतीक होतं. ते कोणाच्या नजरेत पडणार नाही, त्याला कोणी हरवू शकणार नाही, असं म्हटलं जायचं. पण आज देवाची ताकद त्यांच्यापेक्षा मोठी आहे हे सिद्ध झालंय,' असं इराणने म्हटलं आहे.

या विमानाला इतकं महत्त्व का?

अमेरिकेने हे ५व्या पिढीचं अत्याधुनिक लढाऊ विमान आपल्या आणि मित्र देशांच्या हवाई वर्चस्वासाठी तयार केलं होतं. लॉकहीड मार्टिन कंपनीने बनवलेल्या या विमानाची किंमत तब्बल ९५० कोटी रुपये आहे. यात खास स्टेल्थ तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. त्यामुळे हे विमान जगातील कोणत्याही रडार यंत्रणेला चकवून शत्रूच्या हद्दीत घुसून हल्ला करू शकतं आणि परत येऊ शकतं, अशी याची ख्याती होती. जगात असं दुसरं विमान नाही, असंही सांगितलं जात होतं. अमेरिकन सैन्य याला आपली प्रतिष्ठा मानत होतं.

विमानाची खासियत काय?

या विमानाची रचना आणि रडारच्या लहरी शोषून घेण्याची क्षमता याला इतर विमानांपेक्षा वेगळं ठरवते. तसेच, विमान आणि जमिनीवरील सेन्सर्सद्वारे गोळा केलेली युद्धाची सर्व माहिती एकत्र करून काही क्षणांत पायलटला दिली जाते. यामुळे पायलटला कोणतीही परिस्थिती हाताळायला मदत होते.

मध्य-पूर्वेतील युद्धात अणुबॉम्बचा वापर होणार?

जिनिव्हा: मध्य-पूर्वेतील युद्धात सहभागी देश आपली अत्याधुनिक शस्त्रं बाहेर काढत असताना, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अप्रत्यक्षपणे अणुबॉम्ब हल्ल्याची चिंता व्यक्त केली आहे. अणुबॉम्ब हल्ल्यासारख्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण तयारी करत असल्याचं संघटनेने म्हटलं आहे.

याबद्दल बोलताना WHO च्या एका स्थानिक संचालकांनी सांगितलं की, 'या युद्धातील सर्वात वाईट परिस्थिती म्हणजे अण्वस्त्रांचा वापर किंवा अणुभट्ट्यांवर हल्ला. आमचे कर्मचारी यावर लक्ष ठेवून आहेत. आम्ही तयारी करत असलो तरी, होणारं नुकसान थांबवता येणार नाही. जागतिक स्तरावर असे हल्ले सुरू राहिल्यास त्याचे परिणाम अनेक दशकं टिकतील. असं होऊ नये, हीच आमची इच्छा आहे.' यासोबतच, आपल्या कर्मचाऱ्यांना परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य प्रशिक्षण देत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

युद्ध टाळण्यासाठी अमेरिकन सैनिकांकडूनच जहाजाला आग?

वॉशिंग्टन: जगातील सर्वात मोठ्या युद्धनौकांपैकी एक असलेल्या अमेरिकेच्या 'जेराल्ड आर. फोर्ड'वर नुकत्याच लागलेल्या आगीमागे सैनिकांचाच हात होता का? असा संशय आता व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी याच जहाजाच्या शौचालयातही समस्या निर्माण झाली होती.

साधारणपणे अशा जहाजांवरील कर्मचारी ६-७ महिने समुद्रात असतात. पण 'फोर्ड'वरील कर्मचारी गेल्या १० महिन्यांपासून लाल समुद्रात तैनात आहेत. मध्य-पूर्वेतील संघर्षामुळे त्यांना लवकर परतणं शक्य नाही. त्यामुळे मानसिक तणाव आणि नैराश्यातून, किनाऱ्यावर परतण्यासाठी आणि युद्धातून सुटका मिळवण्यासाठी सैनिकांनीच जहाजाचं नुकसान केलं असावं, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

याला दुजोरा देणारी एक गोष्ट म्हणजे, जहाजाची शौचालये बंद पडली तेव्हा त्यात टी-शर्टसारखे कपडे सापडले होते. ही समस्या समुद्रातच दुरुस्त करण्यात आली होती. त्यामुळे निराश झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या बेडला आग लावून परिस्थिती आणखी बिकट केली का, अशी शंका व्यक्त होत आहे. सध्या हे जहाज दुरुस्तीसाठी ग्रीसच्या दिशेने रवाना झालं आहे.