Hindu Student Abhi Found Dead in Bangladesh River : बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार सुरूच असून, नुकताच बेपत्ता झालेल्या अभि नावाच्या हिंदू विद्यार्थ्याचा मृतदेह नवगाव जिल्ह्यातील एका नदीत सापडला आहे.

Hindu Student Abhi Found Dead in Bangladesh River : बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना अधूनमधून घडतच आहेत. तेथील हिंदू आणि भारतीय धोक्यात असल्याने भारत सरकारने आपल्या राजदूतांच्या कुटुंबीयांना बांगलादेश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. काही वृत्तांनुसार, बांगलादेशात आतापर्यंत १५ हून अधिक बांगलादेशी हिंदूंची हत्या झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका हिंदू विद्यार्थ्याचा मृतदेह नदीत सापडला आहे. बांगलादेशातील नवगाव जिल्ह्यातील नदीत विद्यार्थी अभि याचा मृतदेह सापडल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. बांगलादेशातील 'द डेली अग्रजात्रा प्रतिदिन'च्या वृत्तानुसार, शनिवारी दुपारी नौगाव शहरातील कालीतला स्मशानभूमीजवळील नदीत विद्यार्थी अभि याचा मृतदेह सापडला.

सुरुवातीला हा मृतदेह कोणाचा आहे हे ओळखता आले नव्हते, पण नंतर तो हिंदू विद्यार्थी अभि याचा असल्याचे ओळखले गेले. अभि नवगाव जिल्ह्यातील सरकारी महाविद्यालयात मॅनेजमेंट विभागात शिकत होता. तो पदवीच्या चौथ्या वर्षाला होता. ११ जानेवारीपासून तो बेपत्ता होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. नदीत विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच अभिचे कुटुंबीय नदीकिनारी पोहोचले आणि त्याने घातलेल्या कपड्यांवरून मृतदेह त्याचाच असल्याचे ओळखले. मात्र, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अभि हा बोगुरा जिल्ह्यातील आदमदिघी उपजिल्ह्यातील संताहार येथील रहिवासी रमेश चंद्र यांचा मुलगा आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती नौगाव सदर पोलीस ठाण्याचे अधिकारी नियामुल इस्लाम यांनी दिली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण निश्चित केले जाईल, असे त्यांनी सांगितले. बांगलादेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक हिंदूंविरुद्ध वाढत्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. बांगलादेशात झालेल्या अनेक हिंसक हल्ल्यांमध्ये किमान १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी १४ गुन्हे दाखल झाले असून २१ जणांना अटक करण्यात आली आहे, मात्र चार प्रकरणांमध्ये अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

झुंडबळी आणि जमावाकडून होणाऱ्या मारहाणीमुळे अनेक मृत्यू झाले आहेत. मैमनसिंहमध्ये दीपू चंद्र दास यांना कट्टरवाद्यांनी मारहाण करून जाळून अत्यंत क्रूरपणे ठार मारले होते. तसेच, मारहाणीत मृत्यू झालेल्या खोकोन चंद्र दास यांच्यासह अनेक संशयित अद्याप फरार आहेत.

हिंदूंना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यांमध्ये आणि हिंसाचारात अनेकांचा मृत्यू झाला आहे. जेस्सोरमध्ये पत्रकार आणि उद्योजक राणा प्रताप बैरागी यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली होती. तसेच, नरसिंगडीमध्ये शरथ मणी चक्रवर्ती यांची त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तसेच, ज्वेलरी व्यावसायिक प्रांतोस करमाकर यांना घरातून आमिष दाखवून बाहेर बोलावून नंतर गोळ्या घालून ठार मारण्यात आले आणि फरीदपूरमध्ये मत्स्य व्यावसायिक उत्पल सरकार यांची हल्लेखोरांनी हत्या केली. तसेच, पोलीस कोठडीत असलेल्या प्रोलॉय चाकी यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय उपचारास नकार दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. प्रोलॉय चाकी यांच्यासह अनेक हिंदूंचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे.