स्पॅनिश खेळाडूंशी झालेल्या वादानंतर अर्जेंटिनाचा खेळाडू लिएंड्रो परेडेसवरील बंदी फिफाने कायम ठेवली आहे. तर नेहुएल मोलिनाच्या बंदीत फिफाने दिलासा दिला आहे. या कारवाईविरोधात क्रीडा लवाद न्यायालयात जाण्याचा निर्णय अर्जेंटिनाने घेतला आहे.

झुरिच: विश्वचषकाच्या फायनलमधील पराभवानंतर स्पॅनिश खेळाडूंशी झालेल्या वादानंतर बंदीचा सामना करत असलेल्या अर्जेंटिनाचा खेळाडू लिएंड्रो परेडेसचे अपील फिफाने फेटाळले आहे. याचवेळी नेहुएल मोलिनाची बंदी सात सामन्यांवरून चारवर आणली आहे. मोलिनाचा 90,000 डॉलरचा दंडही 60,000 डॉलरवर कमी करण्यात आला आहे. परेडेसची दहा सामन्यांची बंदी आणि 90,000 डॉलरचा दंड कमी करता येणार नाही, असे फिफाने स्पष्ट केले. अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनला ठोठावलेला 3.21 लाख डॉलरचा दंडही कायम आहे.

यानंतर फिफाच्या या कारवाईविरोधात क्रीडा लवाद न्यायालयात दाद मागणार असल्याचे अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने स्पष्ट केले. 19 जुलै रोजी झालेल्या अंतिम सामन्यात एका गोलने पराभूत झाल्यानंतर मोलिना आणि परेडेस स्पॅनिश खेळाडूंशी भिडले होते. विजयाच्या आनंदोत्सवादरम्यान मोलिनाने स्पेनचा कर्णधार रॉड्रीला धडक दिल्याने या घटनेला सुरुवात झाली. स्पॅनिश खेळाडूंनी जाब विचारताच त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. प्रशिक्षक स्कालोनी यांनी खेळाडूंना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

विश्वचषकानंतर परेडेसने या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली होती. मात्र, त्याने वादग्रस्त घटनांचा थेट उल्लेख टाळला होता. अर्जेंटिनाला जे सुख मिळायला हवे होते, ते देऊ न शकल्याची खंत आहे. राष्ट्रीय संघासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत लढलो. इतिहासातील सर्वोत्तम अर्जेंटिना संघाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे, असे परेडेसने इन्स्टाग्रामवर लिहिले होते.

स्पॅनिश खेळाडूंवर हात उगारल्याच्या घटनेबाबत मौन बाळगणाऱ्या परेडेसने माफी मागण्यासही नकार दिला. फिफाने अर्जेंटिनाच्या खेळाडूंविरुद्ध चौकशी जाहीर केल्यानंतर परेडेसने ही प्रतिक्रिया दिली होती