Donald Trump Signals End to Iran Conflict : होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे मोकळी झाली नसतानाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणसोबतचा संघर्ष संपवण्याचा विचार करत आहेत. सहा आठवड्यांच्या युद्धाची योजना आखलेल्या अमेरिकेने आता डिप्लोमॅटिक दबाव टाकण्याची नवी रणनीती बनवली आहे.
Donald Trump Signals End to Iran Conflict : होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे मोकळी झाली नसली तरी, आपण इराणसोबतचा संघर्ष संपवायला तयार आहोत, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांजवळ म्हटलं आहे. 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने हे वृत्त दिलं आहे.
याआधी ट्रम्प यांनी इशारा दिला होता की, जर होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे उघडली नाही, तर इराणच्या वीज प्रकल्पांवर मोठे हल्ले केले जातील. पण आता मात्र ट्रम्प यांनी वेगळा निर्णय घेतला आहे, असं अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या वृत्तात म्हटलं आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याची कारवाई खूप गुंतागुंतीची आहे आणि ती सुरू ठेवल्यास युद्ध आणखी लांबू शकतं. सध्या अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी चार ते सहा आठवड्यांच्या युद्धाची योजना आखली आहे. जर हा संघर्ष असाच सुरू राहिला, तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आधी इराणची नौदल आणि क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करायची आणि त्यानंतर डिप्लोमॅटिक दबावाखाली होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली करण्याचा अमेरिकेचा विचार आहे.
जर हा प्रयत्न यशस्वी झाला नाही, तर होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी करण्याची जबाबदारी युरोप आणि आखाती देशांवर सोपवण्याचा ट्रम्प यांचा इरादा असल्याचंही म्हटलं जात आहे.


