Colombian Military Hercules C 130 Crashes : कोलंबियामध्ये लष्कराचं विमान टेकऑफवेळी कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या विमानात ११० सैनिक होते.
Colombian Military Hercules C 130 Crashes : कोलंबियामध्ये लष्कराचं एक विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. टेकऑफ करतानाच हा अपघात झाला. या विमानात ११० सैनिक प्रवास करत होते. कोलंबियन मीडियानुसार, आतापर्यंत ६७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. अपघातग्रस्त विमान हरक्यूलिस सी-१३० (Hercules C-130) प्रकाराचं होतं. हे विमान प्युर्टो लेगुइझामो (Puerto Leguizamo) येथून सैनिकांना घेऊन प्युर्टो असिसला (Puerto Asis) जात होतं. कोलंबियाच्या दक्षिणेकडील पेरूच्या सीमेजवळ हा अपघात झाला. घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरू आहे.
विमान कोसळल्यानंतर लगेचच संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले. स्थानिक नागरिक जखमी सैनिकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी मदत करत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. 'ही एक अत्यंत दुर्दैवी घटना असून देशासाठी हा एक दुःखद दिवस आहे,' अशी प्रतिक्रिया कोलंबियाचे संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ (Pedro Sanchez) यांनी दिली आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं. अमेरिकेची संरक्षण कंपनी लॉकहीड मार्टिनने (Lockheed Martin) या अपघातावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात बोलिव्हियन हवाई दलाचं असंच एक हरक्यूलिस सी-१३० विमान एका गजबजलेल्या शहरात कोसळलं होतं. त्यावेळी मोठी दुर्घटना होता होता टळली होती.


